रुग्णालय तोडफोडीत माकप, भाजपचा हात,पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आरोप

आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयातील तोडफोडीमध्ये माकप व भाजपचा हात आहे, असा सनसनाटी आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी केला. निवासी डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणातील सत्य दडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही त्या म्हणाल्या.
रुग्णालय तोडफोडीत माकप, भाजपचा हात,पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आरोप
Published on

कोलकाता : आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयातील तोडफोडीमध्ये माकप व भाजपचा हात आहे, असा सनसनाटी आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी केला. निवासी डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणातील सत्य दडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शहरातील मौलाली ते दोरिना क्रॉसिंगदरम्यान निषेध रॅली काढली. आर. जी. कर रुग्णालयात मृत पावलेल्या पीडित डॉक्टरला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी झालेल्या सभेत त्या म्हणाल्या की, निवासी डॉक्टरवर झालेल्या अत्याचार व मृत्यू प्रकरणातील सत्य उघड होणे गरजेचे आहे. पण, सोशल मीडियावरून बनावट बातम्यांद्वारे खोटेपणा पसरवला जात आहे. त्यातून जनतेची दिशाभूल केली जात आहे. या प्रकरणात सत्य दडवण्याचा प्रयत्न होत आहे. या सर्व घटनांचा मी निषेध करते. या प्रकरणातील दोषींना शिक्षा केली जाईल, असे त्यांनी ठणकावले.

डावे पक्ष व भाजप यांच्यातील संगनमत उघड होणे गरजेचे आहे. आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील हिंसाचारामागे डावे पक्ष व भाजपचा हात आहे. या गुन्ह्यातील पुरावा नष्ट करण्यासाठीच त्यांनी रुग्णालयावर हल्ला केला, असा आरोप त्यांनी केला.

हे राज्य सरकारचे अपयश; उच्च न्यायालयाचे ताशेरे

रुग्णालयावर हल्ला हे राज्य सरकारचे अपयश आहे, असे ताशेरे कोलकात्ता उच्च न्यायालयाने शुक्रवारी मारले. पोलीस व रुग्णालयाच्या प्रशासनाने रुग्णालयाच्या परिस्थितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे आदेशही न्यायालयाने दिले. कोलकात्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश टी. एस. शिवागननम यांनी सांगितले की, पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेकडे ७ हजार जण एकत्रित होणार असल्याची माहिती नसणे हे धक्कादायक आहे. येत्या २१ ऑगस्ट रोजी रुग्णालय व पोलिसांनी भिन्न प्रतिज्ञापत्रे सादर करावीत. तसेच रुग्णालयातील तोडफोडीच्या घटनेचा तपशील सादर करण्याचे आदेश न्या. हिरण्यम भट्टाचार्य यांनी पोलिसांना दिले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in