‘एनआयए’ पथकावर हल्ला; प. बंगालमध्ये दगडफेक, अधिकारी जखमी

पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील भूपतीनगर येथे ३ डिसेंबर २०२२ रोजी एका झोपडीवजा घरात बॉम्बस्फोट होऊन तीन जणांचा मृत्यू झाला होता. ते घर तृणमूल काँग्रेसच्या राजकुमार मन्ना या नेत्याचे होते. स्फोटात मन्ना याच्यासह विश्वजीत गायेन आणि बुद्धदेव मन्ना हो तिघे गंभीर जखमी झाले होते.
‘एनआयए’ पथकावर हल्ला; प. बंगालमध्ये दगडफेक, अधिकारी जखमी

कोलकाता : दोन वर्षांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या तपासासाठी पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यात गेलेल्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) पथकावर शनिवारी स्थानिकांनी हल्ला केला. त्यात एनआयएचा एक अधिकारी जखमी झाला. एनआयएने या घटनेविरुद्ध पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. दोन महिन्यांपूर्वी तृणमूल नेता आणि संदेशखळी प्रकरणातील मुख्य आरोपी शहाजहान शेख याला अटक करण्यासाठी गेलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकावरही प. बंगालमध्ये असाच हल्ला झाला होता.

पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील भूपतीनगर येथे ३ डिसेंबर २०२२ रोजी एका झोपडीवजा घरात बॉम्बस्फोट होऊन तीन जणांचा मृत्यू झाला होता. ते घर तृणमूल काँग्रेसच्या राजकुमार मन्ना या नेत्याचे होते. स्फोटात मन्ना याच्यासह विश्वजीत गायेन आणि बुद्धदेव मन्ना हो तिघे गंभीर जखमी झाले होते. हे सर्वजण राज्यात दहशत पसरवण्यासाठी गावठी बॉम्ब तयार करत असल्याचा आरोप होता. या घटनेप्रकरणी एनआयएने गेल्या महिन्यात तृणमूल काँग्रेसच्या आठ नेत्यांविरुद्ध समन्स बजावले होते. त्यांना न्यू टाऊन येथील एनआयएच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, त्यांनी हे समन्स डावलले. त्यामुळे एनआयएचे पथक शनिवारी पहाटे भूपतीनगर येथे दाखल झाले. त्यांनी पाच ठिकाणी धाडी टाकल्या आणि बलाई चरण मैती व मनोव्रत जाना या दोन संशयितांना अटक केली. हे पथक दोघांना घेऊन कोलकात्याला परत जात असताना भूपतीनगर येथे स्थानिकांनी त्याला घेराव घातला आणि त्यांच्यावर विटा आणि दगडफेक सुरू केली. या हल्ल्यात स्थानिक महिलांचाही सहभाग होता. त्यात एनआयए पथकातील कारच्या काचा फुटल्या आणि एक अधिकारी जखमी झाला. त्यानंतर एनआयएने या घटनेबाबत स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल केली. तसेच या पथकाला संरक्षण देण्यासाठी केंद्रीय पोलिसांचा मोठा फौजफाटा भूपतीनगर येथे दाखल झाला.

'एनआयए'नेच हल्ला केला

स्थानिक जनतेने एनआयए पथकावर हल्ला केल्याचे वृत्त चुकीचे आहे. या पथकाने लोकांच्या घरात घुसून स्थानिक महिलांवर हल्ला केला. त्यामुळे महिलांनी एनआयए अधिकाऱ्यांवर प्रतिहल्ला केला, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील बालूरघाट येथील सभेत सांगितले. तसेच, कोणी तुमच्या घरात घुसून महिलांवर हल्ला करत असेल तर तुम्ही गप्प बसाल का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

तृणमूलच्या तालिबानी वृत्तीचे द्योतक

हा हल्ला हे राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या तालिबानी मनोवृत्तीच्या संस्कृतीचे द्योतक आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाने शनिवारी केला. हा हल्ला राज्य-पुरस्कृत असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बॉम्बस्फोटाच्या तपासात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असे मत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी व्यक्त केले. तसेच, सरकारी अधिकारी आणि राज्य सरकार संगनमताने वागत असल्याचा आरोप भाजपच्या प्रदेश कार्यालयाने आपल्या तक्रारीत केला आहे.

अत्यंत गंभीर घटना

एनआयए पथकावर हल्ला होण्याची घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. तिला तितक्याच गांभीर्याने घेतले पाहिजे. या घटनेची हाताळणी अत्यंत कठोरपणे केली पाहिजे, असे मत पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी व्यक्त केले.

logo
marathi.freepressjournal.in