कोलकाता : पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस आणि राज्य शासनातील वाद आता शिगेला पोहोचल्याचे संकेत मिळत आहेत. पश्चिम बंगालचे शिक्षण मंत्री ब्रत्य बसू यांनी राज्यातील उच्चशिक्षण विभाग राज्यपाल बरबाद करीत असून विद्यापीठांना कठपुतळ्या केल्याचे आरोप राज्यपालांवर केले होते. त्यानंतर राज्यपालांनी त्यांना मोठी कारवार्इ करण्याचा इशारा देऊन दोन गुप्त पत्रे लिहिली आहेत. पैकी एक पत्र राज्याचे मुख्य सचिव नबन्ना यांना, तर दुसरे पत्र केंद्र सरकारला पाठवले आहे. दोन्ही पत्रे सीलबंद असून त्यातील मजकूर लवकरच आपल्याला समजेल, असे म्हटले आहे.
राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी शनिवारी रात्री उशिराने ही पत्रे लिहिली. राजभवनातील मुख्य सचिव एच. के. द्विवेदी या प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर राज्यपालांनी ही पत्रे लिहिली आहेत. त्यानंतर शिक्षण मंत्री बसू यांनी शहरात आता नवा पिशाच्च संचार करू लागला आहे, अशा शब्दांत राज्यपालांची थट्टा उडवली होती. त्याआधी राज्यपालांनी 'मध्यरात्रीपर्यंत थांबा, काय करावार्इ झाली ते समजून येर्इल', असे म्हटले होते. राज्यपाल आणि शिक्षण मंत्री यांच्यातील या कलगीतुऱ्यामुळे राज्यपाल चांगलेच भडकले आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या पत्रात राज्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच राज्य कारभार नीट चालत नसल्याचा अहवाल दिला असावा, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.