

कोलकाता : पश्चिम बंगालमधील १४२ जागांसाठीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान बुधवारी पूर्ण झाले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत नोंदवल्या गेलेल्या आकडेवारीनुसार, मतदानाचे प्रमाण ९१.७९% इतके राहिले. ही आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे. मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान, अनेक ठिकाणी हिंसाचार, हाणामारी, लाठीमार आणि ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या घटनांची नोंद झाली आहे.
उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील 'अरबिंद' भागात एका रॅलीदरम्यान ‘टीएमसी’ (तृणमूल कँग्रेस) आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक संघर्ष उफाळून आला. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांचा पाठलाग करत, लाथा-बुक्क्यांनी आणि काठ्यांनी एकमेकांवर हल्ले केले. सर्वत्र सुरक्षा दलांची मोठी कुमक तैनात असूनही, परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे दिसले.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘तृणमुल’चे समर्थक आणि मतदार यांना ‘सीआरपीएफ’ने मारहाण केल्याचा आरोप केला. ‘सीआरपीएफ’ने आपल्या पक्षाच्या अनेक सदस्यांना अटक केल्याचे ममता यांनी सांगितले. मतदार आणि केंद्रीय निरीक्षकांनाही मारहाण केली.