"मी B1 कोचमध्ये होतो, अचानक..." कंचनजंगा एक्सप्रेसमधील प्रवाशांनी सांगितले अपघाताचे भयावह क्षण

West Bengal Train accident : "एका ट्रॅकवर दोन गाड्या कशा आल्या? रेल्वेचा निष्काळजीपणा होता. तिथे खूप प्रवासी होते... काही उत्तरदायित्व नाही का? मला अचानक धक्का बसला. मग मोठ्याने किंकाळ्या झाल्या आणि अचानक पूर्ण अंधार झाला."
"मी B1 कोचमध्ये होतो, अचानक..." कंचनजंगा एक्सप्रेसमधील प्रवाशांनी सांगितले अपघाताचे भयावह क्षण
एएनआय
Published on

पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात मागून आलेली मालगाडी कंचनजंगा एक्सप्रेसला धडकून झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला असून ६० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत असून अनेकजण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, एएनआय या वृत्तसंस्थेसह काही वृत्तवाहिंनींनी कंचनजंगामधील बचावलेल्या प्रवाशांची मुलाखत घेतली असून त्यांनी घटनेच्या वेळी उडालेल्या गोंधळाचे आणि त्यांच्या असहायतेचे वर्णन केले.

सिग्नलकडे दुर्लक्ष केल्यामुळे अपघात?

सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आसाममधील सिलचर ते कोलकातामधील सियालदह दरम्यान धावणारी कंचनजंगा एक्स्प्रेस सियालदहला जात होती. न्यू जलपाईगुडीजवळ असलेल्या रंगपानी स्टेशनजवळ एका मालगाडीने तिला मागून धडक दिली. घटनेच्या वेळी ट्रेन उभी होती. ही धडक इतकी भीषण होती की मालगाडीचे अनेक डबे एक्स्प्रेसवर चढले आणि हवेत लटकलेले दिसले. कंचनजंगा एक्स्प्रेसच्या तीन बोगी रुळावरून घसरून त्यांचे मोठे नुकसान झाले. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मालगाडीच्या मोटरमनने सिग्नलकडे दुर्लक्ष केले आणि उभ्या असलेल्या कंचनजंगा एक्सप्रेसला धडक दिली, ज्यामुळे तीन डबे रुळावरून घसरले. दोन डबे सुमारे २० फूट अंतरावरील ट्रॅकच्या दुसऱ्या बाजूला फेकले गेले, तर एक डबा दुसऱ्या डब्यावर लटकला होता. सुरुवातीच्या अहवालानुसार मालगाडीने सिग्नलकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात झाला.

'ट्रेनमधील प्रवाशांनी सांगितले नेमके काय झाले -

झुतन घोष नावाच्या एका प्रवाशाने, "अचानक झालेल्या अपघाताने जोरदार धक्का बसला. ट्रेनमधील सर्वजण जीवाच्या आकांताने ओरडत होते. कोणतीही मदत त्वरित उपलब्ध नव्हती - रेल्वे अधिकारी किंवा अग्निशमन सेवेचे कर्मचारी तेथे नव्हते. कोणतीही आपत्कालीन सेवा उपलब्ध नव्हती. अधिकारी वेळेवर उपलब्ध असते तर बरीच जीवितहानी टाळता आली असती." असे म्हटले.

दुसऱ्या प्रवाशाने सांगितले की, "एका ट्रॅकवर दोन गाड्या कशा आल्या? रेल्वेचा निष्काळजीपणा होता. तिथे खूप प्रवासी होते... काही उत्तरदायित्व नाही का? मला अचानक धक्का बसला. मग मोठ्याने किंकाळ्या झाल्या आणि अचानक पूर्ण अंधार झाला."

तर, "ही घटना घडली तेव्हा मी माझ्या बी१ कोचमध्ये होतो. अचानक खूप जोरदार झटका जाणवला. धडक बसताच सर्वजण अपघात झाला म्हणत ओरडायला लागले. सगळे रडत होते, ओरडत होते. मी बाहेर येऊन पाहिल्यावर ट्रेनला मागून धडक बसल्याचं समजलं...माझ्या डब्यातील कोणालाही जास्त दुखापत झाली नाही. माझ्या डोक्याला जखम झाली आहे. मी बाहेर आलो तेव्हा मला २-३ लोकांचे मृतदेह पडलेले दिसले", असे अजून एका प्रवाशाने सांगितले. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अन्य एका प्रवाशाने, ट्रेनमध्ये किरकोळ आगी लागल्याचेही सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रेल्वे अपघातावर शोक व्यक्त करीत जिल्हा दंडाधिकारी, डॉक्टर आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत, असे सांगितले. तर, मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे.

सियालदाहमधील हेल्प डेस्क नंबर:-

033-23508794

033-23833326

गुवाहाटी रेल्वे स्टेशन हेल्पलाइन नंबर

03612731621

03612731622

03612731623

लुमडिंग जंक्शन रेल्वे स्टेशन

03674263958

03674263831

03674263120

03674263126

03674263858

KIR स्टेशन हेल्प डेस्क नंबर- 6287801805

कटिहार हेल्पलाइन नंबर

09002041952

9771441956

logo
marathi.freepressjournal.in