विरोधी पक्ष मणिपूरबाबत काय लपवू इच्छितात ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर प्रश्नाबाबत संसदेत निवेदन द्यावे
विरोधी पक्ष मणिपूरबाबत काय लपवू इच्छितात ?

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत मणिपूर प्रश्नावर चर्चा करण्याची तयारी दाखवल्यानंतरही विरोधी पक्षांनी चर्चेला नकार दिला. असे करून काँग्रेस आणि विरोधी पक्ष मणिपूरबाबत नेमके कोणते सत्य लपवू पाहत आहेत, असा सवाल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोमवारी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर प्रश्नाबाबत संसदेत निवेदन द्यावे, या मागणीवरून विरोधकांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चर्चेला नकार देत गोंधळ घातला. त्यामुळे सोमवारीही सभागृहाचे कामकाज बंद पडले. वास्तविक, अमित शहा यांनी सरकार या प्रश्नावर चर्चेला तयार आहे, असे तत्पूर्वी म्हटले होते. तसेच शहा यांनी संसदेत मणिपूरबाबत काही तथ्ये जाहीर करणार असल्याचेही म्हटले होते. तरीही विरोधक चर्चेला तयार झाले नाहीत. त्या अनुषंगाने स्मृती इराणी यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. केंद्र सरकार मणिपूरविषयी चर्चा करण्यास तयारी दाखवत असूनही काँग्रेस आणि विरोधी पक्ष त्याला तयार नाहीत. तसे करून विरोधक मणिपूरबाबत नेमके कोणते सत्य लपवू पाहत आहेत, असा प्रश्न इराणी यांनी उपस्थित केला.

logo
marathi.freepressjournal.in