निज्जर हत्येत सहभागाचा पुरावा काय? भारताची कॅनडाकडे विचारणा

भारताने २०२० सालीच निज्जर याला दहशतवादी घोषित केले होते
निज्जर हत्येत सहभागाचा पुरावा काय? भारताची कॅनडाकडे विचारणा
Published on

नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येचा आरोप भारतावर करणाऱ्या कॅनडाला भारताने आपल्या आरोपाचा पुरावा काय, असा ठणठणीत सवाल केला आहे. भारताचे कॅनडातील उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांनी निज्जर याच्या हत्येत भारताच्या सहभागाचा पुरावा द्या, असा खरमरीत सवाल केला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी सप्टेंबर महिन्यात भारतावर या हत्येचा आरोप केला होता. तेव्हापासून भारत आणि कॅनडा यांचे संबंध ताणले गेले आहेत.

कॅनडातील ग्लोब अॅन्ड मेल या वर्तमानपत्राला वर्मा यांनी मुलाखत दिली. तेव्हा ते म्हणाले की, ‘‘निज्जर यांच्या हत्येच्या तपासाचे पुरावे कॅनडा सरकारने अजूनही जाहीर केलेले नाहीत. अशातच निज्जर हत्येच्या तपासाला तेथील उच्चाधिकाऱ्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आधीच बट्टा लागलेला आहे. यावर पंतप्रधान ट्रुडो यांनी या हत्येचे खापर भारतावर फोडल्यापासून भारत आणि कॅनडा यांच्यातले संबंध कमालीचे दुरावले आहेत. तरी देखील कॅनडाने हत्येसंबंधित चौकशीचा तपशील भारताला दिलेला नाही, अशी टीका वर्मा यांनी केली आहे.

पुरावे कुठे आहेत? चौकशीचे सार काय? तेव्हा मी असेच म्हणेन की, या तपासाला आधीच बट्टा लागलेला आहे. जून महिन्यात कॅनडातील सरे येथे निज्जर याची हत्या झाली तेव्हापासून भारत आणि कॅनडातील संबंधात कमालीचा दुरावा निर्माण झाला आहे. भारताने २०२० सालीच निज्जर याला दहशतवादी घोषित केले होते. यामुळे कॅनडाचा भारतावरील आरोप प्रेरित आणि निर्बुद्धपणाचे आहे. कॅनडाने भारतावर गंभीर आरोप केला खरा, पण या संबंधीचे विशिष्ट पुरावे सादर केले नाहीत. जेणेकरून भारताने त्यांना तपासात सहकार्य केले असते. निज्जरच्या हत्येत भारताच्या हस्तकाचा हात असल्याचे बोलण्यासाठी उच्च पातळीवरून सूचना आल्याचे वर्मा यांनी कुणाचेही नाव न घेता म्हटले आहे.

भारताने कॅनडाकडे प्रत्यार्पणासाठी गेल्या सहा वर्षांत तब्बल २६ वेळा विनंती केली, पण कॅनडाने यावर कोणतीही कारवार्इ केली नसल्याचा कॅनडाचा दावा वर्मा यांनी फेटाळून लावला आहे. तसेच वर्मा यांनी कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार देखील केली आहे. वर्मा यांना स्वत:ला धमक्या आल्यामुळे रॉयल कॅनेडियन माऊंटेड पोलिसांची सुरक्षा दिली गेली असल्याची माहिती देखील दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in