गव्हाचे दर ८ महिन्यांच्या उच्चांकावर ; दिवाळी फराळावर महागाईची संक्रांत

या दरवाढीमुळे चपाती, ब्रेड व बेकरीजन्य पदार्थही महागण्याची दाट शक्यता आहे.
गव्हाचे दर ८ महिन्यांच्या उच्चांकावर ; दिवाळी फराळावर महागाईची संक्रांत

नवी दिल्ली : सध्या नवरात्री सुरू असून लवकरच दिवाळीचे वेध लागायला सुरुवात होईल. दिवाळीच्या काळात घराघरात फराळ केला जातो. शंकरपाळी, चकली, करंजी, अनारसे आदी पदार्थांना गव्हाचा वापर केला जातो. ऐन दिवाळीच्या तोंडावर गव्हाच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली असून त्याचे दर ८ महिन्यांच्या उच्चांकावर पोहचले आहे. या दरवाढीमुळे चपाती, ब्रेड व बेकरीजन्य पदार्थही महागण्याची दाट शक्यता आहे.

दिल्लीत गव्हाच्या दरात १७ ऑक्टोबरला १.६ टक्के वाढ झाली. हा दर २७,३९० रुपये प्रति मेट्रिक टनवर पोहोचला आहे. १० फेब्रुवारी २०२३ नंतरचा हा गव्हाला मिळालेला मोठा दर आहे. गेल्या सहा महिन्यांत गव्हाच्या दरात २२ टक्के वाढ झाली.

सरकारी माहितीनुसार, १७ ऑक्टोबरला गव्हाचे किमान दर ३०.२९ रुपये प्रति किलो, तर कमाल ५८ रुपये प्रति किलो होते. १ मे २०२३ मध्ये गव्हाचे किमान मूल्य २८.७४ रुपये होते, तर कमाल मूल्य ४९ रुपये प्रति किलो होते. गव्हाचे नवीन पीक १५ मार्च २०२४ नंतरच बाजारात येण्याची शक्यता आहे. आता गव्हाच्या किमतीवर नियंत्रण ठेवायला सरकार आपल्या कोट्यातील गहू बाजारात उतरवण्याची शक्यता आहे.

गव्हाची आयात करण्यासाठी आयात शुल्क रद्द करण्याची मागणी केली जात आहे. सरकार सध्या गव्हावर ४० टक्के आयात कर लावते. त्यामुळे गहू आयात महाग झाली. त्यामुळे व्यापारी गहू आयात करायला महाग पडतो. १ ऑक्टोबर २०२३ ला सरकारच्या गोदामात २४ दशलक्ष मेट्रिक टन गव्हाचा साठा होता. गेल्या ५ वर्षांत सरकारचा गव्हाचा सरासरी साठा ३७.६ दशलक्ष मेट्रिक टन होता.

logo
marathi.freepressjournal.in