नवी दिल्ली : कोणत्या नोकरीत वेतनापेक्षा निवृत्त वेतन अधिक देतात, असा प्रश्न काँग्रेसने सेबीप्रमुख माधबी पुरी-बुच यांना विचारला आहे. निवृत्तीनंतर आयसीआयसीआय बँकेने माधबी पुरी-बुच यांना वित्तीय मदत दिली. त्यातून हितसंबंधाला बाधा येत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी केला. २०१४-१५ मध्ये बुच व आयसीआयसीआय बँकेत सेटलमेंट झाली होती, तर २०१५-१६ मध्ये त्यांना आयसीआयसीआय बँकेकडून काहीच मिळाले नाही, तर २०१६-१७ मध्ये त्यांना पेन्शन पुन्हा कशी सुरू झाली, असे खेडा म्हणाले.
२००७-२००८ ते २०१३-१४ पर्यंत बुच यांचा आयसीआयसीआयमधील सरासरी पगार १.३० कोटी होता, तर पेन्शन सरासरी २.७७ कोटी आहे. ही कोणती नोकरी आहे, ज्यात पेन्शन वेतनापेक्षा अधिक आहे, असा सवाल खेडा यांनी केला.
२०१६-१७ मध्ये बुच या सेबीमध्ये पूर्णवेळ सदस्य बनलेल्या होत्या. त्यावेळी त्यांची २.७७ कोटी पेन्शन पुन्हा सुरू झाली, याकडे काँग्रेसने लक्ष वेधले.