‘व्हाईट कॉलर’ दहशतवादी मॉड्युलचा पर्दाफाश; आतापर्यंत २९०० किलो स्फोटके जप्त; २ डॉक्टरांसह ८ जणांना अटक

१५ दिवस चाललेल्या संयुक्त कारवाईत मोठी दहशतवादी साखळी उद्ध्वस्त करण्यात यश आले आहे. पोलिसांनी सांगितले की, हे एक ‘व्हाइट कॉलर’ दहशतवादी नेटवर्क होते. ज्यामध्ये काही व्यावसायिक आणि विद्यार्थी दहशतवाद्यांशी संबंधित होते. ते एन्क्रिप्टेड चॅनेलद्वारे विचारसरणीचा प्रसार, निधीची व्यवस्था आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा यांचा समन्वय साधत होते.
‘व्हाईट कॉलर’ दहशतवादी मॉड्युलचा पर्दाफाश; आतापर्यंत २९०० किलो स्फोटके जप्त; २ डॉक्टरांसह ८ जणांना अटक
Published on

श्रीनगर/फरिदाबाद : ‘जैश-ए-मोहम्मद’ आणि ‘अन्सार गझवात-उल-हिंद’ या दहशतवादी संघटनांशी संबंधित ‘व्हाईट कॉलर’ दहशतवादी मॉड्युलचा पर्दाफाश करण्यात तपास यंत्रणांना यश आले आहे. याप्रकरणी टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये २,९०० किलो स्फोटके जप्त केली असून आठ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये तीन डॉक्टरांचाही समावेश आहे, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.

या १५ दिवस चाललेल्या संयुक्त कारवाईत जम्मू-काश्मीरमधील डॉ. मुझम्मिल गणाई यांना फरिदाबादमधून आणि लखनौच्या डॉ. शाहीन यांना हवाई मार्गाने श्रीनगरला आणून ताब्यात घेण्यात आले. डॉ. शाहीन हिच्या कारमधून एक एके-४७ रायफल सापडली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश आणि हरयाणा पोलिसांसह केंद्रातील यंत्रणांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली. यामुळे मोठी दहशतवादी साखळी उद्ध्वस्त करण्यात यश आले आहे. तथापि, आरोपींना अटक कधी करण्यात आली याचे तपशील त्यांनी दिले नाहीत.

या कारवाईमुळे ‘जैश-ए-मोहम्मद’ आणि भारतातील ‘आयएसआयएस’ची शाखा असलेल्या ‘अन्सार गझवात-उल-हिंद’ या बंदी घातलेल्या संघटनांचे विध्वंसक कारस्थान उधळण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

जप्त केलेल्या २,९०० किलो स्फोटकांमध्ये अमोनियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट आणि गंधकाचा समावेश आहे. यापैकी ३६० किलो ज्वलनशील पदार्थ जो अमोनियम नायट्रेट असल्याचा संशय आहे, तसेच काही शस्त्रे आणि दारुगोळा फरिदाबादमधील गणाईच्या भाड्याच्या घरातून जप्त करण्यात आले, असे जम्मू-काश्मीर पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

विविध ठिकाणांवरून जप्त केलेल्या शस्त्रांस्त्रांमध्ये चिनी बनावटीचे स्टार पिस्तूल आणि दारूगोळे, बेरेट्टा पिस्तूल, एके-५६ रायफल, एके क्रिंकोव्ह रायफल, स्फोटके, रसायने, रिएजंट्स, ज्वलनशील पदार्थ, इलेक्ट्रॉनिक सर्किट्स, बॅटऱ्या, वायर, रिमोट कंट्रोल, टाइमर्स आणि धातूच्या पत्र्या यांचा समावेश आहे.

गणाई हा हरयाणातील दिल्लीलगतच्या अल फलाह विद्यापीठात शिक्षक आहे. श्रीनगरमध्ये ‘जैश-ए-मोहम्मद’च्या समर्थनार्थ पोस्टर लावल्याच्या प्रकरणात जम्मू-काश्मीर पोलिसांनी त्याचे नाव ‘वाँटेड’ यादीत टाकल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

अटक केलेल्या आठ जणांपैकी सात जण काश्मीरमधील आहेत. आरिफ निसार दर उर्फ साहिल, यासिर-उल-अशरफ आणि मकसूद अहमद दर उर्फ शाहिद (नौगाम, श्रीनगर), मौलवी इरफान अहमद (शोपियन), झमीर अहमद अहांगर उर्फ मुतलाशा (वाकुरा, गांदरबल), डॉ. मुझम्मिल अहमद गणाई उर्फ मुसैब (फरिदाबाद) आणि डॉ. आदिल (वानपोरा, कुलगाम). डॉ. शाहीन ही लखनौतील रहिवाशी आहेत.

गणाई आणि आदिल यांच्या मोबाईल फोनमधून अनेक पाकिस्तानी नंबर आढळले असून हेच या नेटवर्कचे संभाव्य हँडलर असल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ते परदेशी हँडलर्सच्या संपर्कात होते आणि सामाजिक आणि शैक्षणिक नेटवर्कद्वारे निधी उभारत होते, असे तपासात उघड झाले आहे.

‘व्हाईट कॉलर’ दहशतवादी नेटवर्क

पोलिसांनी सांगितले की, हे एक ‘व्हाइट कॉलर’ दहशतवादी नेटवर्क होते. ज्यामध्ये काही व्यावसायिक आणि विद्यार्थी दहशतवाद्यांशी संबंधित होते. ते एन्क्रिप्टेड चॅनेलद्वारे विचारसरणीचा प्रसार, निधीची व्यवस्था आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा यांचा समन्वय साधत होते. १९ ऑक्टोबर रोजी, श्रीनगरच्या बनपोरा नौगाम भागात जैश-ए-मोहम्मदचे पोस्टर्स आढळल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान, पोलिसांना आढळून आले की हे नेटवर्क केवळ खोऱ्यातच नाही तर हरयाणा आणि उत्तर प्रदेशातही पसरले आहे.

logo
marathi.freepressjournal.in