कोण आहे पवित्रा गौडा? मर्डर केसमध्ये कन्नड स्टार दर्शनसोबत झाली अटक

धक्कादायक म्हणजे, मृत व्यक्ती दर्शनचा चाहता होता आणि पवित्राच्या सोशल मीडियावर त्याने पवित्राविरोधात काही अवमानकारक, आक्षेपार्ह कमेंट केल्या होत्या आणि दर्शन व त्याच्या पत्नीमधील वादाचं खापरही पवित्रावर फोडलं होतं.
कोण आहे पवित्रा गौडा? मर्डर केसमध्ये कन्नड स्टार दर्शनसोबत झाली अटक
Published on

बेंगळुरूमध्ये ९ जून रोजी रेणुकास्वामी नावाच्या इसमाचा मृतदेह सापडला होता. या हत्येप्रकरणी प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शन थूगूदीप याला म्हैसूर येथून मंगळवारी सकाळी अटक करण्यात आली. त्यानंतर दर्शनची सहकलाकार आणि गर्लफ्रेंड पवित्रा गौडा हिलाही या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक म्हणून अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, मृत व्यक्ती दर्शन थूगूदीपचा चाहता होता आणि पवित्राच्या सोशल मीडियावर त्याने पवित्राविरोधात काही अवमानकारक, आक्षेपार्ह कमेंट केल्या होत्या, त्यामुळे त्याची हत्या करण्यात आल्याचे मानले जात आहे.

कोण आहे पवित्रा गौडा?

पवित्रा गौडा एक कन्नड अभिनेत्री आहे. तिने चित्रपट आणि टेलिव्हिजन दोन्हीमध्ये काम केले आहे. तिने २०१६ मध्ये '54321' या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. तिच्या इंस्टाग्राम बायोनुसार ती एक मॉडेल आणि आर्टिस्ट देखील आहे. ती फॅशन डिझायनिंगमध्ये देखील काम करते आणि 'रेड कार्पेट स्टुडिओ 777' नावाचे बुटीक चालवते.

या वर्षाच्या सुरूवातीलाच पवित्राने इन्स्टाग्रामवर एका व्हिडिओद्वारे खळबळ उडवून दिली होती. यात स्वतःचे आणि दर्शनचे फोटो दाखवून तिने "आमच्या नात्याची १० वर्षे" असे वर्णन केले होते. उल्लेखनीय म्हणजे, दर्शन आणि विजया लक्ष्मी यांच्या लग्नाला आधीच २० वर्षांहून अधिक काळ झाला आहे.

रेणुकास्वामी यांच्या हत्येशी पवित्राचा संबंध

चित्रदुर्ग येथील रेणुका स्वामी (३३) यांचा मृतदेह बेंगळुरूमधील सुमनहल्ली पुलावर नाल्यात सापडला. एका फूड डिलिव्हरी एजंटला कुत्रे मृतदेहाला कुरतडताना दिसल्यावर त्याने पोलिसांना बोलावले. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणुकास्वामी यांनी पवित्राच्या सोशल मीडिया अकाउंटवर आक्षेपार्ह टिप्पण्या पोस्ट केल्या होत्या, तसेच दर्शन आणि त्याच्या पत्नीमधील वादाचं खापरही पवित्रावर फोडलं होतं. त्याने कथितरित्या "आक्षेपार्ह भाषा" वापरली आणि हाच संवाद हत्येचे संभाव्य कारण मानले जात आहेत.

या हत्या प्रकरणात दर्शन आणि पवित्रा गौडा यांच्यासह 13 जणांना अटक करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in