ISI ला माहिती पुरवणाऱ्या एजंटच्या मुसक्या आवळल्या; उत्तर प्रदेश ATS ची मोठी कारवाई

एटीएसने केलेल्या तपासात सिवालचा आयएसआयच्या हस्तकांसह देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याचे आढळून आले आहे. तसेच, तो पैशाच्या बदल्यात...
ISI ला माहिती पुरवणाऱ्या एजंटच्या मुसक्या आवळल्या; उत्तर प्रदेश ATS ची मोठी कारवाई

उत्तर प्रदेश एटीएसने मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयच्या एजंटला उत्तर प्रदेशच्या मेरठमधून अटक करण्यात आली आहे. सत्येंद्र सिवाल असे या एजंटचे नाव असून पाकिस्तानच्या आयएसआयला गुप्त माहिती पुरवल्याच्या आरोपावरून त्याला अटक करण्यात आली आहे.

सत्येंद्र सिवाल हा परराष्ट्र मंत्रालयात MTS (मल्टी-टास्किंग, स्टाफ) म्हणून काम कार्यरत असून तो रशियाच्या मॉस्को येथील भारतीय दूतावासात तैनात आहे. यूपी-एटीएसने देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतल्याने त्याला अटक केली आहे. त्याच्यावर भारतीय दूतावास, परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, भारतीय लष्करी आस्थापनांची गुप्त माहिती पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला पुरवल्याचा आरोप आहे.

सत्येंद्र सिवाल हापूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशन हद्दीतील शाहमहिउद्दीनपूर गावचा रहिवासी आहे. मॉस्कोमधील भारतीय दूतावासात MEA मध्ये MTS म्हणून त्याची नियुक्ती झाली होती. तो २०२१ पासून रशियाच्या मॉस्को येथील भारतीय दूतावासात भारत आधारित सुरक्षा सहाय्यक (IBSA) म्हणून कार्यरत आहे.

लखनौच्या एटीएस पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध कलम १२१A आणि ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट १९२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम १२१A हे देशाविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी लावले जाते.

काही काळापासून यूपी एटीएसला पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या हँडलर्सना क्लासिफाइड कागदपत्रे लीक झाल्याची माहिती मिळत होती. आयएसआय परराष्ट्र मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना दूतावासातील गंभीर माहितीच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात लाच देण्याचे आमिष दाखवत असल्याचेही एटीएसने म्हटले आहे.

एटीएसने केलेल्या तपासात सिवालचा आयएसआयच्या हस्तकांसह देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याचे आढळून आले आहे. तसेच, तो पैशाच्या बदल्यात शत्रूंना गोपनीय माहिती पुरवत असल्याचेही सांगितले जात आहे. एटीएसने सिवालला मेरठमधील एटीएस फील्ड युनिटमध्ये चौकशीसाठी बोलावले असता तो प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही, यावेळी केलेल्या चौकशीत त्याने एटीएसला गुन्ह्यांची कबुली दिल्याचे सांगितले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in