भारतातील खोकल्याचे तीन सिरप धोकादायक; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातील राष्ट्रीय औषध नियामक संस्थांना त्यांच्या देशांत ही उत्पादने आढळल्यास तत्काळ कळविण्याचे आवाहन केले आहे.
भारतातील खोकल्याचे तीन सिरप धोकादायक; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा | प्रातिनिधिक छायाचित्र
भारतातील खोकल्याचे तीन सिरप धोकादायक; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा | प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील तीन ‘निकृष्ट दर्जाच्या’ ओरल खोकल्याच्या सिरपविरुद्ध इशारा जारी केला आहे. या सिरपमध्ये कोल्ड्रिफ, रेस्पीफ्रेश टीआर आणि रिलाइफचा समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातील राष्ट्रीय औषध नियामक संस्थांना त्यांच्या देशांत ही उत्पादने आढळल्यास तत्काळ कळविण्याचे आवाहन केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य तज्ज्ञांना या निकृष्ट औषधांचे निदान झाल्यास, तसेच त्यातून प्रतिकूल परिणाम किंवा अपेक्षित परिणाम न झाल्यास संबंधित राष्ट्रीय नियामक प्राधिकरण किंवा राष्ट्रीय औषध-सुरक्षा केंद्राला अहवाल देण्याचा सल्ला दिला आहे.

मध्य प्रदेशात ‘कोल्ड्रिफ’ सिरप दिल्यानंतर पाच वर्षांखालील किमान २२ मुलांचा मूत्रपिंड निकामी झाल्याने मृत्यू झाला आहे. तसेच राजस्थानमधील वेगवेगळ्या जिल्ह्यांत तीन मुलांचा खोकल्याचे सिरप सेवन केल्यानंतर मृत्यू झाल्याचा संशय आहे.

‘डब्ल्यूएचओ’ने या निकृष्ट औषधांमुळे प्रभावित होण्याची शक्यता असलेल्या देशांमध्ये पुरवठा साखळीवरील देखरेख आणि दक्षता वाढविण्याचेही आवाहन केले आहे.

अनौपचारिक आणि अनियंत्रित बाजारपेठेवरही अधिक लक्ष ठेवावे, असे ‘डब्ल्यूएचओ’ने प्रसिद्ध केलेल्या सूचनेत म्हटले आहे. या सिरपमध्ये सामान्य सर्दी, ताप किंवा खोकल्याची लक्षणे कमी करण्यासाठी वापरले जाणारे घटक असतात.

भारतातील केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने ८ ऑक्टोबर रोजी जागतिक आरोग्य संघटनेला कळवले की, तीन सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकॉल आढळले आहे. ३० सप्टेंबर रोजी भारतातील काही भागांत लहान मुलांच्या मृत्यू आणि तीव्र आजारांचे क्लस्टर ‘डब्ल्यूएचओ’च्या निदर्शनास आले होते.

केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने जागतिक आरोग्य संघटनेला सांगितले की, दूषित सिरप मुलांनी सेवन केले होते आणि संबंधित राज्य प्रशासनाने उत्पादक कंपन्यांच्या उत्पादनास तत्काळ स्थगिती दिली असून त्यांचे परवाने रद्द केले आहेत. तसेच या सिरपचा रिकॉल (वापरातून मागे घेणे) आदेश देण्यात आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अलर्टनुसार, दूषित औषधे खालील कंपन्यांनी तयार केली होती.

कोल्ड्रिफ : श्रेशन फार्मास्युटिकल, रेस्पीफ्रेश टीआर : रेडनेक्स फार्मास्युटिकल्स, रिलाइफ : शेप फार्मा

केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने जागतिक आरोग्य संघटनेला सांगितले की, ही दूषित औषधे भारतातून निर्यात करण्यात आलेली नाहीत आणि बेकायदेशीर निर्यातीचे कोणतेही पुरावे सध्या उपलब्ध नाहीत.

दूषित औषधांचा वापर गंभीर आणि जीवघेणा

‘डब्ल्यूएचओ’ने विविध देशांतील नियामक प्राधिकरणांना अनौपचारिक पुरवठा साखळ्यांमध्ये लक्ष केंद्रित तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे, तसेच डिसेंबर २०२४ नंतर या उत्पादकांकडून तयार झालेल्या इतर औषधांवरही जोखीम मूल्यांकन करण्याचे निर्देश दिले आहेत. या सिरपना “निकृष्ट दर्जाचे” म्हणून घोषित करण्यात आले आहे. ते आवश्यक गुणवत्ता मानकांनुसार नाहीत. अशा दूषित औषधांचा वापर गंभीर आणि जीवघेणा ठरू शकतो. डायथिलीन ग्लायकॉल हे मानवासाठी विषारी असून त्याचे सेवन केल्यास मृत्यू होऊ शकतो. या सिरपमुळे पोटदुखी, उलटी, जुलाब, मूत्र रोखून धरणे, डोकेदुखी, गोंधळलेली मानसिक अवस्था, तसेच तीव्र मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता असून, यामुळे मृत्यू होऊ शकतो.

logo
marathi.freepressjournal.in