BSNL, MTNLला कोणी उद्धवस्त केले?, काँग्रेस अपयशापासून दूर पळू शकत नाही; पंतप्रधानांचा राज्यसभेतून हल्लाबोल

"काँग्रेस म्हणते की आम्ही सरकारी कंपन्या बुडवल्या. मला त्यांना विचारायचे आहे की बीएसएनएल आणि एमटीएनएलला कोणी उद्धवस्त केले? काँग्रेसच्या काळात एचएएलची परिस्थिती आठवा. त्यांनी एचएएल आणि एअर इंडिया नष्ट..."
BSNL, MTNLला कोणी उद्धवस्त केले?, काँग्रेस अपयशापासून दूर पळू शकत नाही; पंतप्रधानांचा राज्यसभेतून हल्लाबोल
Published on

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या काळातील विकास आणि भाजपच्या काळातील विकासाचा मुद्दा मांडला. तसेच. दोन्ही काळातील सरकारी कंपन्यांच्या अवस्थेवर भाष्य केले. यावेळी त्यांनी मी स्वतंत्र भारतात जन्मलो असून माझी स्वप्नेही स्वतंत्र असल्याचे विरोधकांना ठणकावून सांगितले.

"काँग्रेस म्हणते की आम्ही सरकारी कंपन्या बुडवल्या. मला त्यांना विचारायचे आहे की बीएसएनएल आणि एमटीएनएलला कोणी उद्धवस्त केले? काँग्रेसच्या काळात एचएएलची परिस्थिती आठवा. त्यांनी एचएएल आणि एअर इंडिया नष्ट केली. काँग्रेस आणि यूपीए त्यांच्या अपयशापासून दूर पळू शकत नाही", असे मोदी यावेळी म्हणाले.

तसेच, "आज तुम्ही ज्या बीएसएनएलला उद्ध्वस्त केले, ती मेड इन इंडिया 4G आणि 5G कडे वाटचाल करत आहे. एचएएल विक्रमी कमाई करत असून आशियातील सर्वात मोठी हेलिकॉप्टर निर्माण करणारी कंपनी बनली आहे. आम्ही कथा बदलली आहे", असेही मोदी यांनी सांगितले.

मोदी पुढे म्हणाले, एलआयसीबाबतही अफवा पसरवण्यात आल्या होत्या. एखाद्याला नष्ट करायचे असेल तर खोटी माहिती, संभ्रम पसरवला जातो. एलआयसीबाबतही अशा अफवा पसरवण्यात आल्या होत्या. मी तुम्हाला छातीठोकपणे सांगू इच्छितो, आज LIC चे शेअर्स विक्रमी पातळीवर व्यवहार करत आहेत. काँग्रेसने चुकीचे नरेटिव्ह सेट केले, ज्याचा परिणाम काय झाला? तर आज भारतातील संस्कृती आणि सभ्यतेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना हीन समजले जाऊ लागले. अशा प्रकारे आपल्या भूतकाळावर अन्याय झाला.

logo
marathi.freepressjournal.in