कंपनीच्या सिल्वर ज्युबिली कार्यक्रमात विचित्र अपघात; Vistex च्या CEO चा मृत्यू: कोण होते संजय शाह?

या प्रकरणी रामोजी फिल्म सिटीमधील इव्हेंट आयोजित करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंपनीच्या सिल्वर ज्युबिली कार्यक्रमात विचित्र अपघात; Vistex च्या CEO चा मृत्यू: कोण होते संजय शाह?

हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटी येथे गुरुवारी Vistex Asia-Pacific Pvt. Ltd. कंपनीचा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान झालेल्या एका दुर्घटनेत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शाह यांना गंभीर दुखापत झाली. यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर, कंपनीचे अध्यक्ष राजू दतला हे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

कसा घडला अपघात?

हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी येथे होत असलेल्या कंपनीच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात कंपनीचे सीईओ संजय शाह आणि कंपनीचे अध्यक्ष राजू दतला हे एका लोखंडी पिंजऱ्यात होते. त्यांना पिंजऱ्यातून अनोख्या पद्धतीने खाली आणले जात होते. यावेळी दोघेही उपस्थितांना हात दाखवून अभिवादन करत होते. यावेळी त्यांना खाली उतरवताना पिंजऱ्याला आधार देणाऱ्या दोन तारांपैकी एक तार तुटली आणि ते दोघे 15 फूट उंचीवरुन काँक्रीटच्या व्यासपीठावर कोसळले. यात दोघांना गंभीर दुखापत झाली. यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान 56 वर्षीय संजय शाह यांचा मृत्यू झाला. तर, दतला यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी रामोजी फिल्म सिटीमधील इव्हेंट आयोजित करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vistex इलिनॉइस स्थित कंपनी आहे. ही कंपनी महसूल व्यवस्थापन आणि उपाय या संदर्भातील सेवा देते. या कंपनीचे जगभरात 20 कार्यालये आणि 2,000 हून अधिक कर्मचारी आहेत. ही कंपनी GM, Barilla आणि Bayer सारख्या आघाडीच्या ब्रँडना सेवा देते.

कोण होते संजय शहा?

Vistexच्या वेबसाइटवर असलेल्या माहितीनुसार, संजय शाह हे विस्टेक्सचे संस्थापक, CEO आणि मुख्य आर्किटेक्ट होते. मूळचे मुंबईचे असलेले शाह हे एक टेक उद्योजक होते. त्यांनी Vistex ला इंडस्ट्रीतील प्रमुख कंपनी बनवण्यात मोलाची भूमिका बजावली. शाह यांनी लेहाई विद्यापीठात शिक्षण घेतले. तिथेच त्यांनी एक्झिक्युटिव्ह लर्निंग अँड रिसर्चसाठी Vistex Instituteची स्थापना केली. शाह यांच्या नेतृत्वाखाली Vistexने गगनभरारी घेतली. तसेच, शाह हे Vistex फाउंडेशनद्वारे आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत गरजांवर नफा न कमावता काम करणाऱ्या संस्थांना अनुदान देण्यातही अग्रेसर होते.

कोण आहे राजू दतला?

Vistexचे अध्यक्ष राजू दतला 2000 सालापासून कंपनीसोबत आहेत. कंपनीच्या वेबसाइटनुसार कंपनीच्या सोल्युशन डिलिव्हरी क्षमतांना आकार देण्यात आणि विस्तारित करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

logo
marathi.freepressjournal.in