घाऊक महागाईचाही उडाला भडका; डिसेंबरचा निर्देशांक नऊ महिन्यांच्या उच्चांकावर

देशातील घाऊक महागाई डिसेंबर महिन्यात ०.७३ टक्के राहिली आहे.
घाऊक महागाईचाही उडाला भडका; डिसेंबरचा निर्देशांक नऊ महिन्यांच्या उच्चांकावर

नवी दिल्ली : नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीत किरकोळ महागाई वाढल्याचे निदर्शनास आले होते. त्यापाठोपाठा आता घाऊक महागाईचा देखील भडका उडाला आहे. देशातील घाऊक महागाई डिसेंबर महिन्यात ०.७३ टक्के राहिली आहे. घाऊक महागाईचा हा नऊ महिन्यांचा उच्चांक आहे. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये हा दर ०.२६ टक्का होता. खाद्यपदार्थ, यंत्रसामग्री आणि उपकरणे, उत्पादन, वाहतूक उपकरणे आणि संगणक, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑप्टिकल उत्पादनांच्या किमती वाढल्यामुळे घाऊक महागाई वाढली आहे.

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर सलग सात महिने ऋणात्मक राहिल्यानंतर नोव्हेंबरमध्ये सकारात्मक स्थितीत परतला. प्राथमिक वस्तूंची घाऊक महागाई डिसेंबर महिन्यात ५.७८ टक्के झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात हा आकडा ४.७६ टक्के होता. इंधन आणि ऊर्जा आणि उत्पादन क्षेत्रातील महागाई अनुक्रमे उणे २.४१ टक्के आणि उणे ०.७१ टक्का आहे. डिसेंबरमध्ये खाद्य पदार्थांच्या महागाईचा दर नोव्हेंबर २०२३ मधील ४.६९ टक्क्यांवरून ५.३९ टक्क्यांवर पोहोचला. याआधी डिसेंबरमध्येही किरकोळ महागाई ५.६९ टक्के राहिली आहे. हा चार महिन्यांचा उच्चांक आहे. भाजीपाल्याचे भाव वाढल्याने ही महागाई वाढली आहे. भाज्यांची महागाई नोव्हेंबरमधील १७.७ टक्क्यांवरून डिसेंबरमध्ये २७.६४ टक्क्यांवर पोहोचली आहे. नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई ५.५५ टक्के, ऑक्टोबरमध्ये ४.८७ टक्के, सप्टेंबरमध्ये ५.०२ टक्के आणि ऑगस्टमध्ये ६.८३ टक्के होती.

डिसेंबरच्या पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियने महागाईचे उद्दिष्ट ५.४ टक्क्यांवर कायम ठेवले होते. ऑगस्टच्या बैठकीमध्ये आरबीआयने आर्थिक वर्ष २०२४ साठी महागाईचा अंदाज ५.१ टक्क्यांवरून ५.४ टक्क्यांपर्यंत वाढवला होता.

खाद्यपदार्थ, यंत्रसामग्री आणि उपकरणे, उत्पादन, वाहतूक उपकरणे आणि संगणक, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑप्टिकल उत्पादनांच्या किमती वाढल्यामुळे घाऊक महागाई वाढली आहे.

logo
marathi.freepressjournal.in