प्रादेशिक पक्षांशी आघाडी का केली नाही? राहुल गांधी यांनी पदाधिकाऱ्यांना झापले

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड येथे पक्षाला पराभव पत्करावा लागल्याची चर्चा काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत करण्यात आली.
प्रादेशिक पक्षांशी आघाडी का केली नाही? राहुल गांधी यांनी पदाधिकाऱ्यांना झापले
Published on

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता काँग्रेस एकापाठोपाठ बैठका घेत आहे. भाजपविरोधात लढायला प्रादेशिक पक्षांशी आघाडी करावी, अशी सूचना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी केली आहे.

काँग्रेस कार्य समितीची बैठक पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यापासून राहुल गांधींपर्यंत यांनी २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचा मुकाबला करायला विरोधी पक्षांची एकी होणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली २८ विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ आघाडी तयार केली आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड येथे पक्षाला पराभव पत्करावा लागल्याची चर्चा काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत करण्यात आली. हिंदी पट्ट्यात पक्षाचा पराभव झाल्याने पक्षाला मोठा झटका बसला आहे. मध्य प्रदेशात सत्तेविरोधात वातावरण असतानाही त्याचा फायदा पक्षाला मिळाला नाही. समाजवादी पक्षाशी आघाडी करायला काँग्रेसने नकार दिला. प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी न करण्याच्या चुकीबाबत काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत प्रादेशिक नेत्यांना राहुल गांधी यांनी या राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना जाब विचारला. भाजपचा पराभव करायला त्यांनी लहान पक्षांशी आघाडी का केली नाही. मध्य प्रदेश निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेस व सपामध्ये आघाडीची चर्चा होती. मात्र, माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आघाडीस नकार दिला.

कमलनाथ यांचा एककल्ली कारभार व पक्षाकडे आलेल्या प्रतिक्रियांकडे त्यांनी दुर्लक्ष केले, असे काही नेत्यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सांगितले.

काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, तीन राज्यांत प्रादेशिक पक्षांना होणारे मतदान भाजपकडे वळवले. मध्य प्रदेशात सपा नेते अखिलेश यादव यांच्यासोबत आघाडीची बोलणी केली नाही. अखिलेश-वखिलेश अशी खिल्लीही त्यांनी उडवली.

आता राहुल गांधी यांनी सांगितले की, काँग्रेसला छोट्या पक्षांसोबत जागावाटपाबाबत सहमती करायला पाहिजे होती. काँग्रेसला इतर पक्षांसोबत जुळवून घेण्याची गरज आहे. भाजपविरोधातील लढाईत मताचा प्रत्येक टक्का महत्त्वाचा आहे. पक्षाने तिन्ही राज्यांत योग्य पद्धतीने प्रचार केला नाही. तेलंगणात काँग्रेसने गेल्याच वर्षी तिसऱ्या स्थानावरून थेट सत्तेत उडी घेतली, याची आठवण राहुल गांधी यांनी सांगितली.

काँग्रेसच्या काही नेत्यांनी भाजपच्या संघटनात्मक ताकदीबाबत माहिती दिली. त्यावेळी राहुल म्हणाले की, काँग्रेसने २०१८ मध्ये तीन राज्यांत विजय मिळवला होता. भाजप ही अजिंक्य नाही, असे राहुल गांधी म्हणाले. मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, पक्षाचे व्यापक हित लक्षात घेऊन पाच जागा सोडणे अशक्य नव्हते.

logo
marathi.freepressjournal.in