Justice cash case : न्या. यशवंत वर्मा यांच्या बदलीबाबत विचार करणार; सरन्यायाधीशांचे बार असोसिएशनला आश्वासन

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या सरकारी घरी अर्ध्या जळालेल्या नोटा मिळाल्याप्रकरणी गुरुवारी वेगवेगळ्या राज्यांच्या हायकोर्टाच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांची भेट घेतली व याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
 Justice cash case : न्या. यशवंत वर्मा यांच्या बदलीबाबत विचार करणार; सरन्यायाधीशांचे बार असोसिएशनला आश्वासन
Published on

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या सरकारी घरी अर्ध्या जळालेल्या नोटा मिळाल्याप्रकरणी गुरुवारी वेगवेगळ्या राज्यांच्या हायकोर्टाच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांची भेट घेतली व याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, याप्रकरणी न्या. यशवंत वर्मा यांच्या बदलीच्या कॉलेजियमच्या शिफारसी मागे घेण्याबाबत विचार करू, असे आश्वासन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी दिले. याबाबतची माहिती अलाहाबाद उच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष अनिल तिवारी यांनी दिली.

उच्च न्यायालयाचे अलाहाबाद, लखनऊ, गुजरात, केरळ, कर्नाटक आणि मध्य प्रदेशच्या जबलपूर पीठाच्या बार असोसिएशनच्या प्रतिनिधींनी गुरुवारी दुपारी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यासोबत न्या. बी. आर. गवई, न्या. सूर्यकांत, न्या. अभय एस. ओक आणि न्या. विक्रम नाथ यांची भेट घेतली.

या भेटीनंतर अलाहाबाद उच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष अनिल तिवारी यांनी सांगितले की, सरन्यायाधीशांनी विविध बार असोसिएशनच्या मागणीवर चर्चा करून त्यावर विचार करण्याचे आश्वासन दिले.

विविध राज्यांच्या हायकोर्ट बार असोसिएशनने सरन्यायाधीशांना निवेदन दिले. त्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच याप्रकरणी पारदर्शकता बाळगल्याप्रकरणी तसेच दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचा अहवाल व अन्य कागदपत्रे सुप्रीम कोर्टाच्या वेबसाइटवर टाकल्याबद्दल सरन्यायाधीशांच्या निर्णयाचे बार असोसिएशनने कौतुक केले.

गुन्हा दाखल करण्याची मागणी

न्या. यशवंत वर्मा यांची बदली मागे घ्यावी. तसेच त्यांच्याकडील सर्व न्यायिक व प्रशासनिक कार्य मागे घ्यावे, असे निवेदनात म्हटले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या अहवालानुसार, आगीच्या घटनेनंतर एक दिवसानंतर कोणीतरी न्या. वर्मा यांच्या घरातून सामान काढून टाकले होते. त्यामुळे या गुन्ह्यात अन्य व्यक्तीही सामील असू शकतात. याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, तसे न झाल्यास या प्रकरणावर प्रतिकूल परिणाम पडू शकतो, असे निवेदनात म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in