...तर एकटी लोकसभा निवडणूक लढेन -ममता बॅनर्जी

कोलकाता शहरात सर्वधर्म सभेला संबोधित करीत होत्या. त्या म्हणाल्या की, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते इंडिया आघाडीचा अजेंडा राबवू पाहात आहेत.
...तर एकटी लोकसभा निवडणूक लढेन -ममता बॅनर्जी

कोलकाता : इंडिया आघाडीतील जागावाटपातील मतभेद आता अधिक तीव्र होऊ लागले आहेत. आघाडीतील डाव्यांचे महत्त्व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जींना डोर्इजड वाटू लागले आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या पक्षाला योग्य महत्त्व मिळाले नाही तर एकट्याच्या जीवावर लोकसभा निवडणूक लढवू, अशी धमकी ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीला दिली आहे.

त्या कोलकाता शहरात सर्वधर्म सभेला संबोधित करीत होत्या. त्या म्हणाल्या की, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते इंडिया आघाडीचा अजेंडा राबवू पाहात आहेत. इंडिया आघाडीचे इंडिया हे नाव मी सुचवले. पण जेव्हा जेव्हा मी आघाडीच्या बैठकीला जाते तेव्हा तेव्हा डावे पक्ष आघाडीवर नियंत्रण करू पाहात असल्याचे दिसून येते. मी ज्यांच्याशी ३४ वर्षांपासून झगडत आहे त्यांच्याशी मी सहमत होऊ शकत नाही. आघाडीच्या हितासाठी अपमान सहन करूनही मी बैठकांना जात आहे. मी ज्याप्रकारे भाजपला थेट भिडत आहे त्या प्रकारे कोणीच भिडत नाही. किती राजकारण्यांनी भाजपशी थेट वैर पत्करले आहे? एखाद दिवशी मंदिरात गेल्याने भाजपशी लढता येणार नाही. मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च या सर्व ठिकाणी जाणारी मी एकमेव नेता आहे. मी खूप वर्षांपासून संघर्ष करीत आहे. बाबरी मशीद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलीत मी रस्त्यावर उतरली होती. केवळ एकदा मंदिराला भेट देऊन काही घडत नसते, असा टोला त्यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधी यांना लगावला आहे. आसाममध्ये त्यांनी वैष्णव मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना तेथे रोखण्यात आले. या पार्श्वभूमीवर बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांना हा टोला लगावला आहे.

logo
marathi.freepressjournal.in