लॉस एंजेल्स येथे २०२८मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणार?

पुढील वर्षी मुंबईत होणाऱ्या आयओसीच्या सेशनमध्ये याविषयी अंतिम निर्णय घेणे अपेक्षित आहे.
 लॉस एंजेल्स येथे २०२८मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणार?

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तब्बल २४ वर्षांनी क्रिकेटचे पुनरागमन झाल्यानंतर आता ऑलिम्पिकमध्येही क्रिकेट परतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लॉस एंजेल्स येथे २०२८मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबाबत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) विचार करत आहे. पुढील वर्षी मुंबईत होणाऱ्या आयओसीच्या सेशनमध्ये याविषयी अंतिम निर्णय घेणे अपेक्षित आहे.

बर्मिंगहॅम येथे सध्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आठ महिला संघांमध्ये क्रिकेटमधील सुवर्णपदकासाठी चढाओढ सुरू आहे. या स्पर्धेत क्रिकेटला स्थान देण्यात आल्याने आता आयओसी ऑलिम्पिकमध्येही क्रिकेटला आणण्याबाबत विचार करत आहे. यापूर्वी फक्त १९००च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होता. त्यावेळी फ्रान्स आणि ग्रेट ब्रिटन या दोन संघांतच हा सामना झालेला. त्यानंतर जवळपास १२२ वर्षे उलटली असून क्रिकेटपटूंना ऑलिम्पिकमध्ये खेळताना पाहण्याची चाहत्यांची प्रतीक्षा कायम आहे.

लॉस एंजेल्स येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये २८ क्रीडाप्रकारांचा समावेश असेल. त्याव्यतिरिक्त आणखी आठ क्रीडाप्रकार वाढवण्याचा आयओसीचा मानस आहे. यामध्ये बेसबॉल/सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस, ब्रेक डान्सिंग, कराटे, किक-बॉक्सिंग, स्क्वॉश आणि मोटारस्पोर्ट या क्रीडाप्रकारांचा समावेश आहे. ऑलिम्पिकमध्ये कोणत्याही क्रीडाप्रकाराचा समावेश करताना तो दोन्ही गटांसाठी (पुरुष आणि महिला) उपलब्ध असण्याची अट असते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in