माझी पक्षातून हकालपट्टी केल्यास 'कोविड'मधील 40 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करेन - भाजप आमदार

"स्वतःला ‘चौकीदार’ म्हणवून घेणारे आणि ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ अशी घोषणा देणारे देशाचे पंतप्रधान आपल्याच पक्षाच्या नेत्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत मौन बाळगून आहेत, हे अनाकलनीय आहे," असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.
माझी पक्षातून हकालपट्टी केल्यास 'कोविड'मधील 40 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करेन - भाजप आमदार

कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नाराज आमदार बसनगौडा पाटील-यत्नल यांनी आपल्याच पक्षाविरोधात दंड थोपटल्याचे चित्र आहे. जर माझी पक्षातून हकालपट्टी झाली, तर कोविड-19 महामारीच्या काळात येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक भाजप सरकारमध्ये झालेल्या 40 हजार कोटी रुपयांच्या कथित अनियमिततेचा पर्दाफाश करेन, असा इशारा त्यांनी दिला आहे.

पाटील यांनी येडियुरप्पा आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध, विशेषत: येडियुरप्पा यांचा दुसरा मुलगा बी.वाय. विजयेंद्र यांना भाजपच्या राज्य युनिटचे अध्यक्ष बनवल्यापासून मोहीम सुरू केली आहे. भाजपचे अनेक नेते पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत असल्याने पाटील म्हणाले की, "त्यांनी (कर्नाटकमधील भाजप सरकारने) सर्व काही केले आहे (कोविड दरम्यान प्रचंड भ्रष्टाचार). त्यांनी मला नोटीस बजावून पक्षातून काढून टाकण्याचा प्रयत्न करू द्या, मग मी त्यांचा पर्दाफाश करेन."

45 रुपयांचा मास्क 485 रुपयांना विकला-

"एका मास्कची किंमत प्रत्येकी 45 रुपये आहे, मिस्टर येडियुरप्पा, तुमच्या सरकारने कोविड दरम्यान प्रत्येक मास्कवर किती खर्च केला? त्यांनी प्रत्येक मास्कची किंमत 485 रुपये ठेवली होती...," असे संतप्त भाजप आमदार विजयपुरामध्ये म्हणाले. "त्यांनी (भाजप सरकारने) सांगितले की त्यांनी बेंगळुरूमध्ये 10,000 बेडची व्यवस्था केली. या बेडचे भाडे.....लक्षात ठेवा की ते फक्त भाड्याने घेतले होते... जर बेड त्यांनी खरेदी केले असते तर दोन बेड (त्याच किमतीत) विकत घेता आले असते. पण, त्यांनी प्रतिदिन 20,000 रुपये भाडे दिले. सलाईन स्टँड असलेल्या दोन खाटा 20,000 रुपयांनी विकत घेता आल्या असत्या. कोरोनाच्या काळात त्यांनी एका दिवसात किती खर्च केला हे तुम्हाला माहीत आहे का?" असे पाटील पुढे म्हणाले.

कागदपत्रे जाहीर करण्यास सांगितले असता पाटील यांनी लोकलेखा समितीकडे कागदपत्रे उपलब्ध असल्याचे सांगितले. त्यांनी पत्रकारांना कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच के पाटील यांच्याशी बोलण्यास सांगितले, जे भाजपच्या काळात अध्यक्ष होते. "मला लोकलेखा समितीचे अध्यक्ष बनवणार होते. पण मी सर्व सार्वजनिक करेन असे सांगितल्यामुळे नियुक्ती झाली नाही", असा आरोपही पाटील यांनी केला. "या (कोविड) मध्ये किती हजारो कोटी रुपयांची लूट झाली हे तुम्हाला माहिती आहे का? कोविड -19 च्या उद्रेकादरम्यान 40,000 कोटी रुपयांची अनियमितता झाली आहे. भाजप सरकारच्या काळात प्रत्येक रुग्णाला आठ ते दहा लाख रुपयांची बिले आकारण्यात आली." असा दावाही पाटील यांनी केला आहे.

पंतप्रधान गप्प का?

दुसरीकडे, पाटील यांच्या विधानाला त्वरित प्रत्युत्तर देताना, 'येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना झालेल्या अनियमिततेबद्दल पाटील यांनी केलेले आरोप हे भाजपच्या राजवटीत राज्यात '40 टक्के कमिशनचे सरकार' असल्याच्या आरोपांचा पुरावा आहे', असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले. "भाजपचे आमदार बसनगौडा यांच्या आरोपाचा विचार केला, तर आमच्या अंदाजापेक्षा 10 पटीने भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते. आमच्या आरोपांवर ओरडून बाहेर पडलेल्या आणि विधानसभेत पत्रकार परिषद घेणाऱ्या भाजपचे मंत्री आता कुठे लपले आहेत?" या आरोपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत, असा प्रश्नही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. स्वतःला ‘चौकीदार’ म्हणवून घेणारे आणि ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ अशी घोषणा देणारे देशाचे पंतप्रधान आपल्याच पक्षाच्या नेत्यांवरील अशा भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत मौन बाळगून आहेत, हे अनाकलनीय आहे. या मौनामुळे राज्यातील भाजप सरकारच्या भ्रष्टाचारात केंद्रातील नेत्यांचाही हात आहे का, असा प्रश्न निर्माण होतो, असेही सिद्धरामय्या यांनी सोशल मीडियावर लिहिले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in