जम्मू : इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या सहकार्याने काँग्रेस पक्ष जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाला पुन्हा राज्याचा दर्जा देईल, असे आश्वासन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी येथे पुन्हा एकदा दिले. राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला.
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होण्यापूर्वीच जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची आमची इच्छा होती, मात्र भाजप त्यासाठी अनुकूल नव्हता, प्रथम निवडणुका व्हाव्या, अशी भाजपची इच्छा होती, असेही राहुल गांधी यांनी येथे सांगितले. तथापि, भाजपची इच्छा असो वा नसो, आम्ही जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देणारच, असेही त्यांनी स्पष्ट केले.
इंडिया आघाडीच्या बॅनरखाली आम्ही सरकारवर दबाव टाकून जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देणारच, असा निर्धारही गांधी यांनी व्यक्त केला. बनिहाल विधानसभा मतदारसंघातील संगलदान येथे एका जाहीर सभेत ते बोलत होते. जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात या विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.