नवी दिल्ली : सरकारवर दबाव आणून इंडिया आघाडी शेतकऱ्यांना किमान आधारभूत भावाची (एमएसपी) कायदेशीर हमी मिळवून देईल, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी येथे संसदेच्या संकुलात शेतकऱ्यांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर सांगितले.
पंजाब, हरयाणा, उत्तरप्रदेश, तेलंगण, तामिळनाडू आणि कर्नाटकमधील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने त्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत अवगत केले. आम्ही या बाबत इंडिया आघाडीतील नेत्यांशी चर्चा करू आणि शेतकऱ्यांना कायदेशीर हमी मिळवून देण्यासाठी सरकारवर दबाव टाकू, असे राहुल गांधी यांनी वार्ताहरांना सांगितले.