राहुल गांधी रायबरेली सोडणार की वायनाड? दोन्ही मतदारसंघातून राहुल यांना भक्कम मताधिक्य

राहुल गांधी रायबरेली सोडणार की वायनाड? दोन्ही मतदारसंघातून राहुल यांना भक्कम मताधिक्य

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे रायबरेली आणि वायनाड या दोन लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यामुळे ते आता कोणता मतदारसंघ सोडणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे रायबरेली आणि वायनाड या दोन लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यामुळे ते आता कोणता मतदारसंघ सोडणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

याबाबत थेट राहुल गांधी यांना एका पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला गेला. पण त्यांनी तूर्तास ठोस असे काही उत्तर दिले नाही. पण प्रियांका गांधी या निवडणुकीच्या राजकारणात उतरल्यास गांधी परिवाराच्या हक्काचा आणि सुरक्षित असणाऱ्या उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघाचा राहुल गांधी हे राजीनामा देण्याची दाट शक्यता आहे. मात्र, देशाचा पंतप्रधान उत्तर प्रदेशातूनच निवडून येतो, असा आतापर्यंतचा पायंडा असल्याने राहुल हे रायबरेली सोडतील का, असाही एक मतप्रवाह आहे.

राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली या दोन मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. दोन्ही मतदारसंघातून ते विजयी झाले आहेत. त्यामुळे आता त्यांना एका मतदारसंघाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. ते कोणत्या मतदारसंघाचा राजीनामा देतील, यासंदर्भात वेगवेगळे आराखडे मांडले जात आहेत. यासंदर्भात राहुल गांधी यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला गेला असता, त्यांनी दोन्ही मतदारसंघातील मतदारांचे आभार मानले. त्याचप्रमाणे दोन मतदारसंघातून निवडून आल्याने एका मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार आहे, हे त्यांनी कबूल केले, पण वायनाड की रायबरेली याचा अद्याप निर्णय झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गांधी परिवारासाठी रायबरेली हा मतदारसंघ सुरक्षित मानला गेला आहे. १९५२ ला पहिल्यांदा फिरोज गांधी, त्यानंतर फक्त आणीबाणीनंतर या मतदारसंघाने गांधी परिवाराला साथ दिली नाही. पण आजपर्यंत या मतदारसंघातील मतदारांनी कायम गांधी परिवाराला साथ दिली आहे. त्यामुळे वायनाडपेक्षा रायबरेली हा मतदारसंघ अधिक सुरक्षित मानला गेला आहे.

प्रियांका गांधी यांनी गेल्या काही वर्षात उत्त रप्रदेशच्या राजकारणात सक्रियता दाखविली आहे. त्यामुळे त्या जर निवडणुकीच्या राजकारणात उतरण्यास इच्छुक असतील तर त्यांचा एकंदरीत संपर्क पाहता, त्यांना वायनाडपेक्षा रायबरेली मतदारसंघ अधिक सुरक्षित आहे. राहुल गांधी हे वायनाड मतदारसंघातून ३ लाख ६४ हजारांच्या मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यांनी सीपीआयच्या अन्नी राजा यांचा पराभव केला आहे. तर रायबरेली मतदारसंघातून त्यांनी भाजपच्या दिनेश सिंग यांचा तीन लाख मतांच्या फरकाने पराभव केला आहे.

रायबरेलीतून प्रियांका गांधींना उमेदवारीची शक्यता

राहुल गांधी यांचा राजीनामा देण्याचा निर्णय झाला, तर ते रायबरेली या पारंपारिक आणि सुरक्षित असणाऱ्या मतदारसंघाचा राजीनामा देतील, अशीच शक्यता जास्त आहे. आज जरी त्यांनी ते स्पष्ट केले नसले तरी ते हा निर्णय घेतील आणि नंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी यांना येथे उमेदवारी देण्यात येईल, कारण येथून त्यांचा विजय सुकर असेल, असे सध्याचे समीकरण आहे.

logo
marathi.freepressjournal.in