कासवांसाठी क्षेपणास्त्र चाचण्या रोखणार- ओदिशातील ऑलिव्ह रिडले कासवांच्या रक्षणार्थ 'डीआरडीओ'चा निर्णय

कासवांसाठी क्षेपणास्त्र चाचण्या रोखणार- ओदिशातील ऑलिव्ह रिडले कासवांच्या रक्षणार्थ 'डीआरडीओ'चा निर्णय

ओदिशाच्या किनाऱ्यावरील व्हिलर बेटाच्या परिसरात 'डीआरडीओ'तर्फे विकसित करण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्या जातात.

भुवनेश्वर : देशाच्या संरक्षणात अग्रेसर असलेली संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आता पर्यावरण रक्षणातही आपला वाटा उचलणार आहे. ओदिशाच्या किनाऱ्यावरील व्हिलर बेटावर अंडी घालणाऱ्या दुर्मिळ ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी डीआरडीओ तेथून होणाऱ्या क्षेपणास्त्र चाचण्या जानेवारी ते मार्च या कालावधीत थांबवणार आहे. ओदिशाचे मुख्य सचिव पी. के. जेना यांच्या अध्यक्षतेखालील समितीने नुकताच हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे नामशेष होत चाललेल्या या समुद्री कासवांच्या प्रजातीला जगण्याची नवी संधी मिळणार आहे.

ओदिशाच्या किनाऱ्यावरील व्हिलर बेटाच्या परिसरात 'डीआरडीओ'तर्फे विकसित करण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्या जातात. त्यासाठी बालासोरजवळच्या चंडिपूर येथे इंटिग्रेटेड टेस्टिंग रेंजची (आयटीआर) स्थापना केली आहे. त्यांच्यातर्फे क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांचे नियोजन केले जाते. या क्षेपणास्त्रांचे व्हिलर बेटावरून बंगालच्या उपसागरात प्रक्षेपण केले जाते. चाचणीच्या वेळी बेटावर अन्य बरीच यंत्रणा कार्यरत केलेली असते. त्यात प्रखर प्रकाशझोत टाकणारे दिवे आदी यंत्रणेचा समावेश होतो. क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपणावेळी मोठा आवाज होतो. या सगळ्याचा तेथे अंडी घालणाऱ्या कासवांना बराच त्रास होतो. त्यामुळे जानेवारी ते मार्च २०२४ दरम्यान व्हिलर बेटावरून घेण्यात येणाऱ्या क्षेपणास्त्र चाचण्या थांबवण्याचा निर्णय 'डीआरडीओ'ने घेतला आहे.

व्हिलर बेटाजवळच्या लहानशा किनाऱ्यावरील वाळूत यंदा सुमारे पाच लाख ऑलिव्ह रिडले कासवे अंडी घालण्यासाठी जमली आहेत. त्याशिवाय गंजम जिल्ह्यातील ऋषीकुल्य येथे सुमारे ६.६ लाख कासवे जमली आहेत. तेथेही १ नोव्हेंबर ते ३१ मे या काळात मासेमारी ट्रॉलर्सवर बंदी घातली आहे. या परिसरात चालणाऱ्या अनियंत्रित मासेमारीमुळे या कासवांना धोका उत्पन्न होतो. ऑलिव्ह रिडले कासवांची तस्करी करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत. त्यांची अंडी आणि पिले खाण्यासाठी पकडली जातात. तसेच मोठ्या कासवांची मांसासाठी शिकारही होते. अंडी आणि मेलेली लहान कासवे यांचा वापर खत तयार करण्यासाठी केला जातो. त्यामुळे अंड्यातून बाहेर पडल्यानंतर किनाऱ्यावरील वाळूतून समुद्राच्या पाण्यात प्रवेश करेपर्यंत नवजात कासवांना बरेच संरक्षण द्यावे लागते.

यंदा वन खाते, जिल्हा प्रशासन, स्थानिक पोलीस, संरक्षण दले, तटरक्षक दल आदी यंत्रणांनी मिळून कासवांच्या रक्षणासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची योजना आखली आहे. ओदिशाच्या किनारपट्टीवरील गंजम, पुरी, जगतसिंगपूर, केंद्रपाडा, भद्रक आणि बालासोर या सहा जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना वन खात्याबरोबर समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वन खात्याबरोबर अधिक चांगला समन्वय राखण्यासाठी 'डीआरडीओ' नोडल ऑफिसरची नेमणूक करणार आहे. किनारपट्टी पोलीस, तटरक्षक दल आणि पारादीप पोर्ट ऑथॉरिटी यांनी तस्कर आणि अवैध मच्छिमारांवर पाळत ठेवण्यासाठी नौका पुरवल्या आहेत. वन खात्याच्या राजनगर विभागात कांदळवने आणि किनाऱ्यांवर गस्त घालण्यासाठी २० सशस्त्र गार्ड‌्स नेमले आहेत, तर अन्य पाच विभागांत प्रत्येकी १० गार्ड‌्स नेमले आहेत.

कासवांसाठी ओदिशाचा किनारा महत्त्वाचा

ऑलिव्ह रिडले ही कासवांची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असून तिला वाचवण्यासाठी जागतिक स्तरावर मोठे प्रयत्न होत आहेत. बेसुमार मासेमारी, शिकार आणि तस्करी आदी कारणांनी त्यांची संख्या घटत चालली आहे. जगभरात त्यांच्या सुरक्षित पुनरुत्पादनाची मोजकी केंद्रे शिल्लक राहिली आहेत. त्यात ओदिशाच्या किनारपट्टीचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in