बंगळुरू : विरोधी पक्षाच्या संयुक्त बैठकीची दुसरी फेरी सोमवारी बंगळुरूमध्ये सुरू झाली आहे. यावेळी २६ पक्षांसह विरोधी पक्ष आपली ताकद दाखवत आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची उपस्थिती या बैठकीचे वैशिष्ट्ये ठरले. पाटणा येथे झालेल्या विरोधकांच्या बैठकीत सोनिया उपस्थित नव्हत्या. सोनियांना केंद्रस्थानी ठेवून काँग्रेस विरोधी पक्षांमध्ये मुख्य भूमिका मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जात आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी सोनियांचे विविध नेत्यांशी असलेले वैयक्तिक संबंध युतीला अधिक बळकट करतील असा विश्वासही काँग्रेसजनांना आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी आयोजित केलेल्या काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांच्या बंगळुरूमधील बैठकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. भाजपचा सामना कसा करायचा, यावर तेथे सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस सखोल विचारमंथन होणार आहे. तसेच या आघाडीला औपचारिक नाव काय द्यायचे, तिचा समान कार्यक्रम काय असेल, निवडणुकीत जागावाटप कसे करायचे या विषयांवर विस्तृत उहापोह होणे अपेक्षित आहे. अशा प्रकारची ही दुसरी बैठक आहे. यापूर्वी पाटणा येथे विरोधकांची बैठक झाली होती.
भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) बैठक मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्या संदर्भाने खर्गे म्हणाले की, विरोधकांच्या एकजुटीने भाजप गडबडला आहे. त्यामुळेच ते मंगळवारी ही बैठक घेत आहेत. यापूर्वी मोदी यांनी राज्यसभेत विधान केले होते की, सर्व विरोधकांना हाताळण्यासाठी मी एकटा पुरेसा आहे. मग आता ते या लहान-सहान पक्षांची मोठ बांधण्याचा प्रयत्न का करत आहेत, असा प्रश्न खर्गे यांनी उपस्थित केला. भाजप गोळा करत असलेले ३० राजकीय पक्ष नेमके कोणते आहेत, त्यांची निवडणूक आयोगाकडे किमान नोंदणी तरी झाली आहे का, असाही सवाल खर्गे यांनी उपस्थित केला.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पाहुण्यांसाठी सोमवारी रात्री खास मेजवानीचे आयोजन केले आहे. या बैठकीला राहुल गांधी, सोनिया गांधी, एम. के. स्टालिन, अरविंद केजरीवाल, नितीश कुमार, हेमंत सोरेन, भगवंत मान, लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी, तेजस्विनी यादव, संजय सिंग, राघव चड्ढा, ओमर अब्दुल्ला आदी नेते उपस्थित राहिले आहेत.
शरद पवार मंगळवारी येणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे सोमवारी या बैठकील उपस्थित राहणार नसून ते मंगळवारी बंगळुरूला जातील. सोमवारी महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असल्याने शरद पवार यांना मुंबईत राहणे गरजेचे होते. मात्र, मंगळवारी ते बंगळुरूला बैठकीसाठी हजर होतील. याबाबत माझे त्यांच्याबरोबर फोनवरून संभाषण झाले असून ते उद्या नक्की येणार आहेत, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले.