थोडासा दबाव पडताच… ते पलटले! राहुल गांधींचा नितीश कुमारांवर निशाणा

थोडासा दबाव पडताच त्यांनी (नितीश कुमार) यू-टर्न घेतला. पण दबाव का? कारण आम्ही जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे मांडत आहोत, असे राहुल गांधी म्हणाले.
थोडासा दबाव पडताच… ते पलटले! राहुल गांधींचा नितीश कुमारांवर निशाणा

पाटणा : दोन दिवसांपूर्वी घडलेल्या बिहारमधील राजकीय घडामोडींनंतर इंडिया आघाडीला धक्का बसला असून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रथमच नितीश कुमार यांनी भाजपसोबत संसार थाटल्याबद्दल टीका केली आहे. थोडासा दबाव पडताच त्यांनी (नितीश कुमार) यू-टर्न घेतला. पण दबाव का? कारण आम्ही जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे मांडत आहोत, असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ मंगळवारी बिहारमध्ये दाखल झाली. बिहारच्या पुर्णिया जिल्ह्यात मंगळवारी जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, “भाजपला सामाजिक न्यायाचे तत्त्व मान्य नाही. पण इंडिया आघाडी म्हणून आम्ही सामाजिक न्यायाची भूमिका मांडत राहू आणि त्यासाठी आम्हाला नितीश कुमार यांची गरज नाही. आम्ही देशातील बेरोजगारी आणि आर्थिक विषमतेकडेही लक्ष वेधले. सत्ताधारी भाजप या प्रश्नांची सोडवणूक करण्याऐवजी द्वेषाची पेरणी करत आहे. ज्यामुळे सामाजिक आणि आर्थिक विषयाकडून दुर्लक्ष होत आहे.”

“नितीश कुमार कुठे फसले? हे मी तुम्हाला सांगतो. बिहारमध्ये जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी आम्ही नितीश कुमार यांच्याकडे केली होती. काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने नितीश कुमार यांच्यावर दबाव टाकून जनगणना करून घेतली. पण दुसऱ्या बाजूनेही त्यांच्यावर दबाव आला. कारण भाजपला या देशात जातनिहाय जनगणना करायची नाही. या देशात दलित, आदिवासी, वंचित यांची संख्या किती? हे भाजपला जाणून घ्यायचे नाही. त्यामुळे भाजपच्या दबावापुढे नितीश कुमार झुकले. भाजपने त्यांच्यासाठी मागचे दार उघडले आणि नितीश कुमार त्या मार्गाने चालू पडले,” अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली.

बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीला धक्का देऊन पुन्हा एकदा भाजप आणि एनडीएशी हातमिळवणी केली आहे. त्यानंतर राजद, सपा आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती.

या सभेत राहुल गांधी यांनी नितीश कुमार यांच्याबाबतचा एक विनोदी किस्साही सांगितला. ते म्हणाले, “बिहारचे मुख्यमंत्री राज्यपालांकडे शपथविधीसाठी गेले. खूप धामधूम सुरू होती. भाजपचे नेते, राज्यपाल आणि आमदार त्याठिकाणी बसले होते. नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतात आणि सर्वांची सदिच्छा भेट घेऊन ते शपथविधीनंतर मुख्यमंत्री निवासस्थानी निघून जातात. गाडीत बसल्यावर त्यांना कळते की, ते राज्यपालांच्या निवासस्थानी ते आपली शाल विसरले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री ड्रायव्हरला पुन्हा राज्यपालांच्या निवासस्थानी गाडी नेण्यास सांगतात. जसे ते राज्यपालांच्या निवासस्थानी पोहोचतात आणि दरवाजा उघडल्यावर राज्यपाल त्यांना म्हणतात, इतक्या लवकर परत (शपथविधीसाठी) आलात. अशी अवस्था सध्या बिहारची आहे. थोडासा दबाव पडताच ते यू-टर्न घेतात.”

logo
marathi.freepressjournal.in