
तामिळनाडूची राजधानी चेन्नईत भाजपच्या एका महिला नेत्याच्या पतीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी आधी पाठलाग केला आणि नंतर भर रस्त्यावरच धारदार शस्त्रांनी अनेक वार केले. नंतर त्यांना रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेलं पाहून ते मरण पावले, असं समजून हल्लेखोर ऑटोरिक्षामधून पळून गेले. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
भर रस्त्यात धारदार शस्त्रांनी वार-
भाजपच्या महिला विंगच्या पदाधिकारी नादिया यांचे पती श्रीनिवासन यांचा हल्लेखोरांनी पाठलाग केला आणि नंतर अण्णा नगरमध्ये भागामध्ये पोहोचल्यावर त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला. श्रीनिवासन यांना रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेलं पाहून ते मरण पावले असं समजून हल्लेखोरांनी ऑटोरिक्षात बसून पळ काढला. दरम्यान घटनास्थळावर उपस्थित काही लोकांनी भर रस्त्यात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्याचप्रमाणे परिसरातील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही ही घटना कैद झाली. त्यानंतर या घटनेचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
सीसीटीव्ही फूटेजमुळं आरोपींची ओळख पटली-
आजतकच्या वृत्तानुसार, या व्हिडिओंवरून हल्लेखोरांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं आहे. प्रशांत, प्रकाश, श्रीनिवासन, सरवणन, राजेश आणि राजेश अशी हल्लेखोरांची नावं आहेत. सर्व हल्लेखोरांनी नोलांबूर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. दरम्यान, सोवकरपेठ येथील आणखी दोन जणांनी खुनाचा आरोप स्वतःवर घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ते पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचं तपासात समोर आलं आहे.
वैयक्तिक वैमनस्यातून हल्ला?
वैयक्तिक वैमनस्यातून हा प्रकार घडल्याचं प्राथमिक तपासात समोर आले आहे. श्रीनिवासन यांचा अनेक वर्षांपूर्वी एका खुनाच्या घटनेत सहभाग असल्याचं बोललं जात आहे. नोलांबूर पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणाऱ्या सहा जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सखोल तपास सुरू आहे. दरम्यान श्रीनिवासन यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.