Video : 5 रुपयांसाठी महिला आणि कॅब ड्रायव्हरचं भयंकर भांडण, कंपनीला मागावी लागली माफी

कॅब बूक करतेवेळी भाडे 95 रुपये दाखवले होते असे म्हणत महिलेचा अतिरिक्त 5 रुपये देण्यास नकार
Video : 5 रुपयांसाठी महिला आणि कॅब ड्रायव्हरचं भयंकर भांडण,
कंपनीला मागावी लागली माफी

कॅब ड्रायव्हर आणि महिला प्रवासी यांच्यात झालेल्या जोरदार खडाजंगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. वास्तविक, कॅब ड्रायव्हरने महिलेकडे 5 रुपये अधिक भाडे मागितल्यामुळे त्यांच्यात वाद झाला. जेव्हा महिलेने 'इनड्राइव्ह' अॅपद्वारे कॅब बुक केली तेव्हा भाडे 95 रुपये दाखवण्यात आले, परंतु नंतर ड्रायव्हरने 100 रुपये मागितले, यामुळे ती संतप्त झाली.

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कॅब चालक महिलेला प्रवासासाठी 100 रुपये देण्यास सांगत आहे. पण, कॅब बूक करतेवेळी भाडे 95 रुपये दाखवले होते असे म्हणत ती अतिरिक्त 5 रुपये देण्यास नकार देते. अशातच महिला व्हिडिओ बनवत असल्याचे चालकाच्या लक्षात येते आणि तो अजूनच संतापतो. प्रवासादरम्यान कोणतेही अतिरिक्त अंतर कापल्यास पुढील पैसे द्यावे लागतील, असे तो जोरजोरात ओरडून सांगतो.

मात्र, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 'इनड्राइव्ह' कंपनीने चालकाच्या वागणुकीबद्दल तात्काळ माफी मागितली आणि या समस्येचे निराकरण करण्यासाठी निर्णायक पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले आहे. व्हिडिओवर टिप्पणी करताना, इनड्राइव्हने लिहिले की, “आमच्या प्रवाशांना सहन कराव्या लागलेल्या त्रासदायक अनुभवाबद्दल आम्ही खरोखर दिलगीर आहोत. आमच्या प्लॅटफॉर्मवर ड्रायव्हरचे असे वर्तन अजिबात सहन केले जाणार नाही. अशा घटनांवर उपाय म्हणून आम्ही ठोस पावलं उचलण्यास वचनबद्ध आहोत, कारण आमच्या ग्राहकांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वात महत्वाची आहे. आमची टीम या प्रकरणाची चौकशी करेल. याबद्दल पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला आम्ही वैयक्तिकरित्या आमच्याशी संपर्क साधण्याची विनंती करतो. याबाबत तुम्ही देऊ शकाल ते कोणतेही अतिरिक्त तपशील आमच्यासाठी महत्त्वाचे असतील. धन्यवाद."

या व्हिडिओवर नेटकरी जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. ओला, उबेर सारख्या अन्य कॅबमध्ये तर असे प्रकार सर्रास घडतात आणि अतिरिक्त पैसे द्यावे लागतात असे म्हणत अनेकजण टीका करीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in