मुंबई : देशातील ब्लू आणि ग्रे-कॉलर (शारीरिक श्रम आणि सेवा क्षेत्रातील) कामगारांमध्ये आता चांगल्या नोकऱ्या आणि अधिक पगारासाठी महिला व फ्रेशर्स (नवीन उमेदवार) मूळ शहराबाहेर पडत आहेत. यामुळे जानेवारी ते एप्रिल २०२६ या कालावधीत नोकरीसाठी होणाऱ्या स्थलांतरात वार्षिक ३१.४ टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.
ब्लू आणि ग्रे-कॉलर भरती मंच 'वर्कइंडिया'च्या अहवालानुसार, हा भारताच्या कामगार क्षेत्रातील एक ऐतिहासिक बदल होत असल्याचे स्पष्ट होत आहे. देशातील ब्लू आणि ग्रे-कॉलर वर्कफोर्समधील अधिकाधिक महिला, फ्रेशर्स आणि इतर कामगार चांगल्या नोकऱ्या, उत्तम वेतन आणि चांगल्या भविष्यासाठी आपल्या गृहनगरांच्या पलीकडे पाहत आहेत.
स्थानिक अर्जांपेक्षा स्थलांतराचा वेग जास्त : एकाच शहरात नोकरीसाठी येणाऱ्या अर्जांमध्ये २०.२% वाढ झाली आहे. याच्या तुलनेत दुसऱ्या शहरात जाऊन काम करू इच्छिणाऱ्या कामगारांची संख्या १.५ पटीने वेगाने वाढत आहे.
महिलांच्या भागीदारीत वाढ : दीर्घकाळापासून पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात आता मोठा बदल पाहायला मिळत आहे. ब्लू आणि ग्रे-कॉलर श्रेणीतील महिला उत्तम संधींसाठी आपले शहर सोडण्यास तयार आहेत. यामुळे गेल्या अनेक दशकांपासून असलेली लैंगिक दरी कमी होत आहे.
अनुभवी लोकांपेक्षा फ्रेशर्स आघाडीवर : अनुभवी उमेदवारांच्या तुलनेत पहिल्यांदाच नोकरी शोधणाऱ्या फ्रेशर्सचे दुसऱ्या शहरात अर्ज करण्याचे प्रमाण ११ टक्क्यांनी वाढले आहे, तर अनुभवी कामगारांमध्ये ही वाढ ५ टक्के आहे.
बदलती मानसिकता : कामगार, ऑफिस वर्क, सेल्स (विक्री) आणि हेल्थकेअर (आरोग्य सेवा) या क्षेत्रांमधील कर्मचारी आता स्थलांतराकडे 'अंतिम पर्याय' म्हणून पाहत नसून, उत्तम पगार आणि चांगल्या कामाच्या वातावरणासाठी घेतलेला एक 'जाणीवपूर्वक निर्णय' म्हणून पाहत आहेत. मॅन्युफॅक्चरिंग (उत्पादन), डिलिव्हरी आणि ड्रायव्हर, ऑटोमोबाईल, घरगुती कामे या क्षेत्रांमध्ये स्थलांतर सुरू आहे.
मेट्रो शहरांच्या पलीकडे संधी
अहवालानुसार, रोजगाराच्या संधी आता केवळ मुंबई, दिल्लीसारख्या पारंपारिक मेट्रो शहरांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. अहमदाबाद, जयपूर, कोईम्बतूर, इंदूर आणि लखनऊसारख्या 'टियर-२' शहरांमधील कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर भरती सुरू केली आहे. त्यामुळे या शहरांकडे येणाऱ्या अर्जांची संख्या वाढत आहे. मेट्रो शहरांमधील राहणीमानाचा खर्च, घरांचे वाढते भाव आणि वेतनातील तफावत यांमुळे कामगार आता या नवीन शहरांना पसंती देत आहेत.