Jantar Mantar Protest Delhi : महिला पत्रकारांचा पोलिसांवर छळाचा आरोप

जंतरमंतर येथे शनिवारी (दि. ३) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुरू असलेल्या निदर्शनांचे वृत्तांकन करताना पोलिसांकडून लैंगिक छळ झाल्याचा आरोप तीन महिला पत्रकारांनी केला आहे.
Jantar Mantar Protest Delhi : महिला पत्रकारांचा पोलिसांवर छळाचा आरोप
Published on: 

नवी दिल्ली : जंतरमंतर येथे शनिवारी (दि. ३) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुरू असलेल्या निदर्शनांचे वृत्तांकन करताना पोलिसांकडून लैंगिक छळ झाल्याचा आरोप तीन महिला पत्रकारांनी केला आहे. या तिन्ही पत्रकारांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशीसाठी त्या गुन्हे शाखेच्या कमला मार्केट युनिटकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.

दिल्ली पोलिसांनी सोशल मीडियावर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ३ ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळली जात असताना तीन महिला पत्रकारांनी काही पोलीस अधिकाऱ्यांविरोधात लैंगिक छळाचे आरोप केले. त्यानंतर संबंधित तक्रारी नवी दिल्ली जिल्हा पोलिसांकडे दाखल करण्यात आल्या. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी तक्रारी गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत.

एका महिला पत्रकाराने शनिवारी ‘पीटीआय’शी बोलताना एका सहाय्यक पोलीस आयुक्ताने तिच्याशी गैरवर्तन करत लैंगिक छळ केल्याचा आरोप केला. या घटनेनंतर पत्रकारांनी जंतरमंतर परिसरातच ठिय्या देत संबंधित अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली होती.

दरम्यान, निदर्शनांचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांशी पोलिसांनी केलेल्या कथित गैरवर्तनाची प्रेस कौन्सिल ऑफ इंडियानेही गंभीर दखल घेतली आहे. या प्रकाराबद्दल कौन्सिलने ‘तीव्र धक्का आणि नाराजी’ व्यक्त केली. पत्रकारांना वृत्तांकन करताना सुरक्षित वातावरण मिळणे आवश्यक असून अशा आरोपांची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याची भूमिका विविध स्तरांतून मांडली जात आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in