आज संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या तिसरा दिवस आहे. आज लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा पार पडत आहे. कायदा मंत्री अर्जुन मेघवाल यांनी सर्वप्रथम लोकसभेत या विधेयकातील तरतुदींची माहिती दिली. यानंतर काँग्रेस खासदार सोनिया गांधी यांनी महिला आरक्षण विधेकाला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली.
कायदा मंत्री मेघवाल यांनी मंगळवारी महिला आरक्षण विधेयक मांडलं हबोतं. यावर चर्चेसाठी आज सकाळी ११ ते सायंकाळी ६ अशी ७ तासांची वेळ निश्चित करण्यात आली आहे. काँग्रेसच्या वतीने सानिया गांधी लोकसभेत बोलत आहेत. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, "काँग्रेसचा महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा आहे. मी या विधेयकाच्या समर्थनार्थ उभी आहे. माझ्या आयुष्यातील ही एक मोठी गोष्ट असून महिलांचा सहभाग सुनिश्चित करणारे पहिले विधेयक माझे पती राजीव गांधी यांनी आणलं होतं", असं सोनिया गांधी म्हणाल्या.
त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, आज त्याचा परिणाम म्हणजे देशभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून १५ लाख महिला नेत्या निवडून आल्या आहेत. राजीव गांधींचं स्वप्न अर्धचं पूर्ण झालं. ते या विधेयकाच्या मंजूरीमुळे पूर्ण होणार आहे. काँग्रेसचा या विधेयकाला पाठिंबा असून हे विधेयक मंजूर झाल्यामुळे आम्ही आनंदी आहोत.पण चिंताही आहे. महिला गेल्या १३ वर्षांपासून राजकीय नेतृत्वाची वाट पाहत आहेत. हे विधेयक तातडीने मंजूर करावं, अशी आमची मागणी आहे, असं त्यांनी सांगितलं.
भारतीय महिलांमध्ये हिमालयासारखा संयम आहे. नव्या भारताच्या उभारणीत महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढल्या. स्री कधीही संकटाच्या ओझ्याखाली दबली गेली नाही. कठीण काळात महिलांनी महात्मा गांधी, नेहरु आणि पटेल यांची स्वप्ने पुढे नेली. इंदिरा गांधींचे व्यक्तिमत्व हे त्यांचं उदाहरण आहे. यासोबतच जातींची जनगणना करुन एससी/एसटी/ओबीसी आरक्षण द्यावं. त्यासाठी आवश्यक ती पावलं सरकारने उचलली पाहिजेत, असं देखील त्या म्हणाल्या.