Pahalgam Terror Attack : भारत-पाकिस्तान युद्ध टाळण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच हे युद्ध टाळण्यासाठी अमेरिकेने मध्यस्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (डावीकडून)
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (डावीकडून)
Published on

नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच हे युद्ध टाळण्यासाठी अमेरिकेने मध्यस्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तानचे पंतप्रधान यांच्याशी अमेरिकेने चर्चा केली. मात्र, या हल्ल्याचे गुन्हेगार, त्यांना पाठबळ देणारे आणि हल्ल्याचे नियोजन करणारे अशा सगळ्यांना शिक्षा व्हायलाच हवी, अशी पोस्ट भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी समाज माध्यमांवर टाकून देशाचे इरादे स्पष्ट केले आहेत.

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद भारतात उमटताना दिसत आहेत. पाकिस्तानला धडा शिकवण्याची संतप्त भावना सामाजिक, राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सीमेवर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये आता अमेरिकेने भारत व पाकिस्तान यांच्यात युद्ध टाळण्यासाठी मध्यस्थी सुरू केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी यासंदर्भात भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी चर्चा केली आहे.

अमेरिकेचा सल्ला

अमेरिकेने भारत व पाकिस्तानला या मुद्द्यावरून संघर्ष न वाढवण्याचा सल्ला दिला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते टॅमी ब्रुस यांनी यासंदर्भात बुधवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यानंतर रात्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ व भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी फोनवर चर्चा केली. या चर्चेनंतर एस. जयशंकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून भारताची भूमिका स्पष्ट केली आहे.

हल्ल्याचा निषेध करण्याचा पाकिस्तानला सल्ला

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान मार्को रुबियो यांनी पाकिस्तानने पहलगाम हल्ल्याचा निषेध करावा व यासंदर्भातील तपासात पूर्ण सहकार्य करावे, असा सल्ला दिल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते टॅमी ब्रुस यांनी दिली आहे. पाकिस्तानने भारतासोबत तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, थेट संपर्क पुन्हा सुरू करावा आणि दक्षिण आशियात शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करावी, असेही त्यांनी शरीफ यांना सांगितल्याचे ब्रुस म्हणाले.

शस्त्रसंधीचे उल्लंघन

एकीकडे भारत व पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेकडून मध्यस्थी केली जात असताना दुसरीकडे पाकिस्तानकडून मात्र सीमेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. पहलगाम हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानवर निर्बंध लादले. मात्र, तेव्हापासून रोज पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार केला जात आहे. भारताकडूनही याला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर परिस्थिती निवळण्याऐवजी अधिकच तणावपूर्ण होऊ लागल्याचे दिसून येत आहे.

काय म्हणाले परराष्ट्र मंत्री?

एस. जयशंकर यांनी गुरुवारी सकाळी या चर्चेसंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी बुधवारी रात्री पहलगाम हल्ल्यासंदर्भात चर्चा झाली. या हल्ल्याचे गुन्हेगार, त्यांना पाठबळ देणारे आणि हल्ल्याचे नियोजन करणारे अशा सगळ्यांना शिक्षा व्हायला हवी, असे जयशंकर यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे भारत पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचेच या पोस्टमधून स्पष्ट होत असल्याचे बोलले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in