ज्ञानवापीच्या तळघरात पूजेला परवानगी; हिंदू पक्षाला मोठा दिलासा

मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या वाराणसीतील ज्ञानवापी मशीद प्रकरणात बुधवारी वाराणसी जिल्हा कोर्टाने हिंदू पक्षकारांच्या बाजूने निकाल दिला आहे.
ज्ञानवापीच्या तळघरात पूजेला परवानगी; हिंदू पक्षाला मोठा दिलासा

प्रयागराज : मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या वाराणसीतील ज्ञानवापी मशीद प्रकरणात बुधवारी वाराणसी जिल्हा कोर्टाने हिंदू पक्षकारांच्या बाजूने निकाल दिला आहे. ज्ञानवापी मशिदीतील व्यास तळघरात हिंदू पक्षकारांना पूजा करण्याचा अधिकार मिळाला आहे. ज्ञानवापी मशिदीतील व्यास तळघरात आता हिंदू भाविक पूजा करु शकतात. ७ दिवसात पूजा करण्याची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हिंदू पक्षकारांनी व्यास तळघरात १९९१ पर्यंत पूजा होत असल्याचा दावा होता. न्यायालयाने मंगळवारी व्यास तळघर जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवले होते. मुस्लीम पक्षकारांकडून या निर्णयाला हायकोर्टात किंवा सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे. ज्ञानवापी प्रकरणात हिंदू बाजूचे प्रतिनिधित्व करणारे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले, “हिंदू पक्षाला ‘व्यास का तहखाना’ येथे पूजा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाला ७ दिवसांच्या आत व्यवस्था करावी लागेल. प्रत्येकाला पूजा करण्याचा अधिकार असेल. आम्ही अलाहाबाद हायकोर्टात कॅव्हेट दाखल करणार आहोत.”

ज्ञानवापी मशिदीमध्ये एक तळघर आहे, ज्यामध्ये सोमनाथ व्यास देवाच्या मूर्तीची पूजा करायचे. तळघर १९९३ पासून बंद होते आणि तळघराची चावी वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे संरक्षक म्हणून ठेवण्यात आली होती. ब्रिटीश राजवटीतही तेथे पुजारी व्यासजींचा ताबा होता आणि डिसेंबर १९९३ पर्यंत तेथे पूजा केली जात असल्याचे पुरेसे पुरावे आहेत. आता विश्वनाथ मंदिरातील पुजाऱ्यांनी इथे पूजा करावी आणि बॅरिकेड्स हटवण्याची व्यवस्था करावी, असे जिल्हा न्यायाधीशांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

पं. सोमनाथ व्यास यांचे नातू शैलेंद्र पाठक यांनी ज्ञानवापी येथील व्यासजींचे तळघर जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे सोपवण्याची आणि त्यांना अधिकार देण्याची मागणी करणाऱ्या पं. सोमनाथ व्यास यांनी दाखल केलेल्या खटल्यातील निकाल जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांनी मंगळवारी राखून ठेवला होता. एएसआयच्या सर्वेक्षणाच्या कारवाईदरम्यान हे तळघर स्वच्छही करण्यात आले.

प्राचीन शिल्पे आणि धार्मिक महत्त्व

गेल्या वर्षी २५ सप्टेंबर रोजी शैलेंद्र कुमार पाठक यांच्या वतीने दावा दाखल करून ज्ञानवापीच्या दक्षिणेला असलेल्या इमारतीत तळघर असल्याचा दावा केला होता. हे प्राचीन मंदिराचे मुख्य पुजारी व्यास कुटुंबाचे मुख्य आसन आहे. हिंदू धर्मातील उपासनेशी संबंधित अनेक प्राचीन शिल्पे आणि धार्मिक महत्त्वाची इतर सामग्री तेथे आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in