
गेल्या तीन दिवसांपासून चर्चेत असलेले भारतीय कुस्तीपटूंचे धरणे आंदोलन अखेर शुक्रवारी मध्यरात्री मागे घेण्यात आले. आंदोलकांपैकी भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने मीडियाला याबाबत माहिती दिली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आंदोलकांची भेट घेतल्यानंतर ही घोषणा केली. गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी निदर्शने केली होती. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्ष आणि प्रशिक्षकांकडून महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण होत असल्याचा गंभीर आरोप काही कुस्तीपटूंनी केला होता. त्यात ऑलिम्पिक, राष्ट्रकुल खेळांमध्ये भारतासाठी पदके जिंकणाऱ्या काही कुस्तीपटूंचाही समावेश आहे. काहींनी खेळाडूंना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोपही केला आहे. या सर्व आरोपांमुळे कुस्तीपटूंचे आंदोलन देशात चर्चेचा विषय ठरले. केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीनंतर मिळालेल्या आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर कुस्तीप्रेमींनी मध्यरात्री आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. ब्रिजभूषण सिंह हे उत्तर प्रदेशातील भाजपचे प्रभावी नेते आहेत. ते सहा वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. याआधीही ब्रिजभूषण सिंग एका व्हिडिओमुळे वादात सापडले होते. 2021 मध्ये, एका शिबिरात कुस्तीपटूला मुक्का मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
दरम्यान, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आंदोलक कुस्तीपटूंची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. चर्चेदरम्यान त्यांनी आंदोलकांना आरोपांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले. या समितीच्या सदस्यांची नावे शनिवारी जाहीर करण्यात येणार असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले. अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली आहे की ही समिती पुढील 4 आठवड्यात चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करेल. दरम्यान, समितीची चौकशी पूर्ण होईपर्यंत भारतीय ऑलिम्पिक संघटनेने ब्रिजभूषण सिंग यांना पदापासून दूर राहण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात येत आहे.