कुस्तीपटूंचे पुन्हा आंदोलन! बजरंग, साक्षी, विनेश विरोधात युवा खेळाडू सरसावले

साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांच्याविरोधात युवा कुस्तीपटूंनी आंदोलन. दिल्लीतील जंतरमंतर मैदानात शकडो पैलवान जमले आणि त्यांनी या तिघांचा निषेध करत घोषणाबाजी केल्या
कुस्तीपटूंचे पुन्हा आंदोलन! बजरंग, साक्षी, विनेश विरोधात युवा खेळाडू सरसावले

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाबाबत सुरू असलेल्या वादाला बुधवारी नवे वळण पाहायला मिळाले. साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांच्याविरोधात युवा कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी दिल्लीतील जंतरमंतर मैदानात शकडो पैलवान जमले आणि त्यांनी या तिघांचा निषेध करत घोषणाबाजी केल्या.

आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंच्या हातात घोषणा लिहिलेले बॅनर होते. यापैकी एकात लिहिले होते की, साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी देशाची कुस्ती उद्ध्वस्त करून टाकली आहे. आंदोलन करणारे जुनियर कुस्तीपटू उत्तर प्रदेश, हरयाणा आणि दिल्ली येथून आले आहेत. पोलिसांनी सांगितले की, आंदोलन कर्त्यांच्या निदर्शनाबाबत कोणतीही पूर्व माहिती नव्हती. या आंदोलनात बागपतच्या छपरौली येथील ३०० जुनियर कुस्तीपटूंचा समावेश आहे. याशिवाय नरेलाच्या वीरेंद्र रेसलिंग अकादमीमधून काही कुस्तीपटू आले आहेत. एवढेच नाहीतर आता आणखी काही पैलवान या ठिकाणी येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याच जंतरमंतर मैदानावर साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी एक महिन्याहून अधिक काळ आंदोलन केले होते, त्याच मैदानावर या लोकांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. मैदानावर पोहचल्यानंतर या लोकांनी तिन्ही कुस्तीपटूंच्या विरोधात घोषणाबाजीही केल्या.

त्याशिवाय साक्षी मलिक, बजरंग पुन्हा आणि विनेश फोगाट यांच्या आंदोलनावर आता कुस्तीतल्या काही खेळाडूंनी संशय व्यक्त केला आहे. जागतिक कुस्ती संघटनेला पत्र लिहून या कुस्तीगीरांमुळे आम्हा कुस्तीगीरांच्या स्वप्नांचा चुराडा होत असल्याची तक्रार या खेळाडूंनी केली आहे. विशेष म्हणजे ज्या अल्पवयीन खेळाडूने बृजभूषण यांच्याविरोधात आरोप केले होते, तिने पण नंतर तक्रार मागे घेतली. या आंदोलनामुळे झालेले नुकसान आणि आपली झालेली फसवणूक यांचा पाढा तिने वाचला आहे.

या तीन आंतरराष्ट्रीय कुस्तीगीरांनी गेल्या वर्षी जानेवारीत बृजभूषण यांच्याविरोधात आंदोलन छेडले. बृजभूषण यांनी काही खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यातून एक आंदोलन उभे राहिले. हे तीन खेळाडू प्रामुख्याने सगळ्यात आघाडीवर होते. ज्यांचे आरोप होते त्या खेळाडू मात्र समोर आलेल्या नव्हत्या. मात्र आता कुस्तीची परिस्थिती अधिक बिकट बनली आहे. नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांच्या महासंघाला निलंबित करण्यात आले आहे. त्याजागी एक स्वतंत्र पॅनल नेमण्यात आले असून ते पॅनल आता कुस्तीच्या स्पर्धा, शिबिरे यावर देखरेख ठेवणार आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे कुस्तीत अभूतपूर्व असा गोंधळ माजला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in