कॅपिटल अक्षरात प्रिस्क्रिप्शन लिहा! ओदिशा उच्च न्यायालयाचे डाॅक्टरांना आदेश

डॉक्टरांना आता औषधांची चिठ्ठी लिहिताना स्पष्ट आणि सुवाच्च हस्ताक्षरात किंवा कॅपिटल अक्षरात लिहावी लागेल.
कॅपिटल अक्षरात प्रिस्क्रिप्शन लिहा! ओदिशा उच्च न्यायालयाचे डाॅक्टरांना आदेश

भुवनेश्वर : डॉक्टरांनी मेडिकलमधून औषधे घेण्यासाठी लिहून दिलेली चिठ्ठी म्हणजे अनेकदा सामान्य माणसाच्या आकलनाबाहेरचा विषय असतो. काही काही वेळा तर मेडिकल स्टोअर चालकांनाही त्याचे आकलन होत नाही. त्यामुळे चुकीची औषधे दिली जाण्याची भीती असते. म्हणून आता डॉक्टरांनी कॅपिटल अक्षरात प्रिस्क्रिप्शन लिहावे, असे आदेश ओदिशा उच्च न्यायालयाने दिले आहेत. ‘झिग-झॅग’ लिहिणं बंद करा, असा आदेश ओदिशा हायकोर्टाने दिला आहे.

ओदिशातील डेंकनाल जिल्ह्यातील हिंडोल येथील रसनंद भोई यांचा मोठा मुलगा सौवाग्या रंजन भोई याचा साप चावल्याने मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीनंतर हायकोर्टाने हा आदेश दिला आहे. डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन लिहिताना स्पष्ट हस्ताक्षर वापरावं, ज्यामुळे औषधांची नावे सर्वसामान्यांनाही वाचता येतील आणि कोणतीही संदिग्धता राहणार नाही, असे न्यायालयाने आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे.

उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ‘अनेक प्रकरणांमध्ये, शवविच्छेदन अहवाल लिहिताना बहुतेक डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे वैद्यकीय-कायदेशीर कागदपत्रे समजून घेताना अडचण निर्माण होते. न्यायालयालाही अशी वैद्यकीय कागदपत्रे वाचणे कठीण जाते. डॉक्टरांमध्ये झिग-झॅग हस्ताक्षराचा ट्रेंड बनला आहे, ज्यामुळे सामान्य व्यक्ती आणि न्यायव्यवस्थेला ही कागदपत्रे वाचणे कठीण होत आहे. उच्च न्यायालयाच्या या नवीन आदेशामुळे आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा अपेक्षित आहे.

सर्व डॉक्टरांना आदेशाची प्रत पाठवा

डॉक्टरांना आता औषधांची चिठ्ठी लिहिताना स्पष्ट आणि सुवाच्च हस्ताक्षरात किंवा कॅपिटल अक्षरात लिहावी लागेल. राज्यातील सर्व डॉक्टर, खासगी रुग्णालये आणि वैद्यकीय केंद्रांना यापुढे सर्व प्रिस्क्रिप्शन, शवविच्छेदन अहवाल आणि वैद्यकीय-कायदेशीर कागदपत्रे स्पष्ट आणि सुवाच्च हस्तलिखितात किंवा मोठ्या अक्षरात लिहिण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती एस. के. पाणिग्रही यांनी मुख्य सचिवांना या आदेशाची प्रत सर्व वैद्यकीय केंद्रे, खासगी दवाखाने आणि वैद्यकीय महाविद्यालयांना पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in