'यासीन मलिकने माझ्यासमोर जवानांवर गोळ्या झाडल्या'; हल्ल्यात बचावलेल्या जवानाची सीबीआय न्यायालयात साक्ष

यासिन मलिकवर माजी केंद्रीय गृमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची कन्या रुबिया सईद यांचे अपहरण करण्याच्या गुन्ह्यांतर्गत देखील खटला सुरू
'यासीन मलिकने माझ्यासमोर जवानांवर गोळ्या झाडल्या'; हल्ल्यात बचावलेल्या जवानाची सीबीआय न्यायालयात साक्ष

जम्मू : जेकेएलएफ अर्थात जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट दहशतवादी संघटनेचा म्होरक्या यासीन मलिक याने माझ्या डोळ्यासमोर बंदूक बाहेर काढून जवानांवर गोळ्या झाडल्या, अशी साक्ष याच हल्ल्यातून नशिबाने बचावलेला आयएएफ कॉर्पोरल राजवर उमेश्वर सिंग याने सीबीआय न्यायालयात गुरुवारी दिली.

माजी आयएएफ कॉर्पोरल राजवर उमेश्वर सिंग याने २५ जानेवारी १९९० रोजी श्रीनगर येथे घडलेल्या या दहशतवादी हल्ल्याची माहिती न्यायालयासमोर सादर केली. त्या दिवशी जेकेएलएफ दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात भारतीय हवाई दलाचे चार जवार हुतात्मा झाले होते. तर राजवर उमेश्वर सिंग नशिबाने बचावले होते. त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ही घटना घडतांना पाहिली होती. या बाबतची सीबीआय न्यायालयात खास सुनावणी गुरुवारी झाली. तेव्हा सध्या तिहार जेलमध्ये असलेल्या या संघटनेचा म्होरक्या यासिन मलिक याला देखील हजर करण्यात आले होते.

सुनावणी दरम्यान राजवर सिंग यांनी यासिन मलिकला पाहून सांगितले की त्या दिवशी याच माणणाने आपली फेरण उचलून त्यातून बंदूक काढली आणि आयएएफच्या जवानांवर गोळीबार केला. या गोळीबारात स्क्वॉड्रन लीडर रवी खन्ना सह चार जवान हुतात्मा झाले होते तर ४० लोक जखमी झाले होते. श्रीनगरमधील रावलपोरा येथे ही घटना घडली होती. आयएएफ म्हणजे भारतीय हवाई दलाचे पथक तेथे श्रीनगर विमानतळावर ड्युटीवर हजर होण्यासाठी वाहनाची वाट पाहात उभे होते. तेथेच त्यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या प्रकरणाच्या तपासानंतर ३१ ऑगस्ट १९९० साली यासिन मलिक आणि त्यांचे अन्य पाच साथीदार यांच्यावर आरोपत्र दाखल करण्यात आले.

जम्मूच्या टाडा न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. मलिक यांच्यासोबत अली मोहम्मद मीर, मंझूर अहमद सोफी उर्फ मुस्तफा, जावेद अहमद मीर उर्फ नालका, शौकत अहमद बक्षी, जावेद अहमद झरगार आणि नानाजी यांना आरोपी करण्यात आले आहे. हे सर्व जेकेएलएफचे सदस्य असून त्यांच्यावर आयएएफ जवानांच्या हत्येचा आरोप आहे. राजवर सिंग याने यासिन मलिकला ओळखून दिलेली साक्ष ही या खटल्यातील एक महत्वाची घटना आहे.

यासिन मलिकवर माजी केंद्रीय गृमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची कन्या रुबिया सईद यांचे अपहरण करण्याच्या गुन्ह्यांतर्गत देखील खटला सुरू आहे. साक्षीदाराची उलट तपासणी करण्याची संधी मलिक याला देण्यात आली होती. मात्र, त्याने ती नाकारली आणि केवळ न्यायालयात हजर राहणे पसंत केले.

logo
marathi.freepressjournal.in