
तब्बल पाच वेळा आमदार आणि एकदा खासदार अशी राजकीय कारकीर्द आणि कुख्यात माफिया अशी वाटचाल करत उत्तर प्रदेशमध्ये आपले गुंडागिरीचे साम्राज्य उभारलेल्या अतिक अहमदची सत्ता आणि १४०० कोटींचे साम्राज्य योगी सरकारने अवघ्या ५० दिवसांत उद्धवस्त केले.
वयाच्या १७ व्या वर्षापासून गुंडगिरी करायला लागलेल्या अतिकने पैसा आणि सत्तेच्या वाटेवर एकामागोमाग एक अशी शिखरे गाठली, पण २४ फेब्रुवारी रोजी उमेश पालची हत्या केल्यापासून त्याच्या या साम्राज्याला उतरती कळा लागली. झांशी येथे मुलगा असद एन्काऊंटरमध्ये ठार झाला. नंतर स्वत: अतिक व त्याचा भाऊ अश्रफ यांची पोलिसांच्या संरक्षणात प्रसारमाध्यमांशी बोलत असतानाच शनिवारी हत्या झाली. हत्या होण्यापूर्वी एक दिवस आधीच त्याने आपणास धुळीस मिळवण्यात आले, असे वक्तव्य केले हेाते.
अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने त्याच्या ५० बनावट कंपन्या आणि १४०० कोटी रुपये बाहेर काढले आहेत. तसेच टोळीच्या मालकीची बरीच शस्त्रास्त्रे देखील ईडीने जप्त केली आहेत. अतिकची टोळी याच बनावट कंपन्यांच्या माध्यमातून आपला काळा पैसा पांढरा करीत असे. अतिकची १४०० कोटींची मालमत्ता जप्त करण्यासोबत ईडीच्या १५ पथकांनी अतिकचे मनीलाँड्रिंगमधील १०८ कोटी रुपये देखील उघडकीस आणले आहेत. ईडीच्या धाडीमध्ये सापडलेल्या कागदपत्रांमधून अतिकच्या सर्व ५० कंपन्या फक्त मनीलॉड्रिंग करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अतिकचे वकील, अकाऊंटंट, रिअल इस्टेट व्यावसायिक असलेल्या बसपाच्या माजी आमदारावर देखील ईडीची कुऱ्हाड कोसळली आहे. अतिकच्या पाच मुलांपैकी एक ठार झाला आहे. दोन तुरुंगात आहेत तर उरलेले दोन बालसुधारगृहात आहे. अतिकची बायको शाइस्ता आणि हत्या झालेला भाऊ अश्रफ याची बायको अशा दोघीजणी गायब आहेत. अतिकची बहीण देखील गायब असून, तिचा नवरा तुरुंगात आहे. अतिकचे अन्य नातेवाईक त्याच्याशी संबंध असल्याचे उघड करण्यास घाबरत आहेत. अतिकच्या एकूण कुटुंबाची वाताहात झाली आहेच. त्यातून कुत्र्यांची पण सुटका झालेली नाही. अतिकच्या तीन ग्रेट डॅनपैकी दोन कुत्रे उपासमारीने दगावले आहेत.