उत्तर प्रदेशातील सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये ‘वंदे मातरम्’ सक्तीचे करणार - योगी आदित्यनाथ

'वंदे मातरम्'ला विरोध करणे हे केवळ अन्याय्यच नाही तर भारताच्या फाळणीमागील एक दुर्दैवी कारण आहे, असे स्‍पष्‍ट करत उत्तर प्रदेशमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 'वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत सक्तीचे केले जाईल, अशी घोषणा सोमवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली.
उत्तर प्रदेशातील सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये ‘वंदे मातरम्’ सक्तीचे करणार - योगी आदित्यनाथ
Published on

गोरखपूर : 'वंदे मातरम्'ला विरोध करणे हे केवळ अन्याय्यच नाही तर भारताच्या फाळणीमागील एक दुर्दैवी कारण आहे, असे स्‍पष्‍ट करत उत्तर प्रदेशमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 'वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत सक्तीचे केले जाईल, अशी घोषणा सोमवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. गोरखपूर येथे 'एकता यात्रा' आणि वंदे मातरम् सामूहिक गायन कार्यक्रमात ते बोलत होते. देशात जिना प्रवृत्तीने पुनर्जन्म घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला येथे जिवंत गाडून टाकू, असा इशाराही त्‍यांनी दिला.

यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले की, राष्‍ट्रीय गीत असणार्‍या वंदे मातरमबद्दल आदराची भावना असली पाहिजे. आम्ही उत्तर प्रदेशातील प्रत्येक शाळा आणि शैक्षणिक संस्थेत त्याचे गायन सक्तीचे करू. वंदे मातरम‌्ला विरोध करणे हे राष्ट्रविरोधी मानसिकतेचे प्रतीक आहे. असे विचार आता सहन केले जाणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेस अधिवेशनात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी १८९६-९७ मध्ये स्वतः संपूर्ण वंदे मातरम‌् गायले होते आणि १८९६ ते १९२२ पर्यंत प्रत्येक काँग्रेस अधिवेशनात वंदे मातरम‌् गायले जात होते. तथापि, १९२३ मध्ये, जेव्हा मोहम्मद अली जौहर काँग्रेसचे अध्यक्ष झाले, तेव्हा वंदे मातरम‌् गायला सुरुवात होताच ते उभे राहिले आणि निघून गेले. त्यांनी वंदे मातरम् म्हणण्यास नकार दिला. वंदे मातरमला अशा प्रकारचा विरोध भारताच्या फाळणीचे दुर्दैवी कारण बनले.

काँग्रेसने मोहम्मद अली जौहर यांना राष्ट्रपती पदावरून काढून टाकले असते आणि वंदे मातरमद्वारे भारताच्या राष्ट्रवादाचा आदर केला असता, तर भारताचे विभाजन झाले नसते, असा दावा मुख्यमंत्री योगीआदित्य‍नाथ यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in