तुम्ही ‘आप’ फोडा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री; भाजपने ऑफर दिल्याचा सिसोदियांचा दावा

आपमध्ये फूट पाडून भाजपात प्रवेश करण्याचा आणि या मोबदल्यात सीबीआय व ईडीच्या चौकशीचा ससेमिरा थांबवण्याचा प्रस्ताव भाजपने माझ्यासमोर ठेवला
तुम्ही ‘आप’ फोडा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री; भाजपने ऑफर दिल्याचा सिसोदियांचा दावा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी दिल्लीत भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ फेल झाल्याचा दावा केला. ‘भाजपने महाराष्ट्रासहित अन्य राज्यांसारखे दिल्लीतही ‘ऑपरेशन लोटस’ राबवण्याचा प्रयत्न केला; मात्र दिल्लीमध्ये ते प्रयत्न फोल ठरले. सीबीआयची छापेमारी भ्रष्टाचाराचा तपास करण्यासाठी नव्हे, तर सरकार पाडण्यासाठी होती, असा दावाही केजरीवाल यांनी केला. मात्र तुम्ही ‘आप’ फोडा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करतो, अशी ऑफर भाजपने दिल्याचा धक्कादायक दावा उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला.

“आपमध्ये फूट पाडून भाजपात प्रवेश करण्याचा आणि या मोबदल्यात सीबीआय व ईडीच्या चौकशीचा ससेमिरा थांबवण्याचा प्रस्ताव भाजपने माझ्यासमोर ठेवला आहे; पण मी महाराणा प्रताप यांचा वंशज आहे. राजपूत आहे. माझे शिर कापले तरी चालेल; पण भ्रष्ट व कटकारस्थान्यांपुढे केव्हाच झुकणार नाही,” असे सिसोदिया म्हणाले.

दरम्यान, सिसोदियांच्या या पत्रकार परिषदेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरापुढे निदर्शने सुरू केली. भाजपने सिसोदियांची उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

यंदा गुजरात व हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीचा फड रंगणार आहे. यामुळे ‘आप’कडून सिसोदिया यांची स्वच्छ प्रतिमा व चांगले शिक्षणमंत्री म्हणून त्यांचा बचाव केला जात आहे. यासाठी त्यांच्या जातीचीही मदत घेतली जात आहे. याद्वारे गुजरातमधील राजपूत समजाची सहानुभूती मिळवता येईल, असा ‘आप’चा अंदाज आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in