बाप आणि बापाचा पक्ष तुम्हीच विकला;मुख्यमंत्री शिंदेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुंबईत गटप्रमुखांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर जोरदार प्रहार केला
बाप आणि बापाचा पक्ष तुम्हीच विकला;मुख्यमंत्री शिंदेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर

आम्ही मिंध्ये नाही, आम्ही बाळासाहेबांचे खरे लढवय्ये आहोत. आम्हाला अस्मान दाखवू म्हणणाऱ्यांना आम्ही तीन महिन्यांपूर्वीच अस्मान दाखवले. आम्ही ठेचा खाऊन मोठे झालो, म्हणूनच आम्ही त्यांना ठेचले. आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणाले, मग बाप आणि बापाचा पक्ष विकणारे तुम्ही आहात, असे म्हणावे का?” असे जोरदार प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले.

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुंबईत गटप्रमुखांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर जोरदार प्रहार केला, त्याला मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतून प्रत्युत्तर दिले. “खुर्चीच्या लालसेपोटी भाजपला दूर करून शिवसेना पक्षप्रमुखांनी राष्ट्रवादी, काँग्रेसशी संधान साधून सत्ता स्थापन केली. सरकार आमचे; पण आमच्याच लोकांवर अन्याय सुरू होता आमचे लोक जेलमध्ये टाकले जात होते, राष्ट्रवादी, काँग्रेससोबत असूनही शिवसेनेवर अन्याय झाला,” असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “२०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नावावर मते मागितली होती. शिवसेना, भाजपचे सरकार स्थापन करू, हे आम्ही जनतेला आश्वासन दिले; पण प्रत्यक्षात दुसऱ्यांशीच घरोबा केला. ही जनतेशी प्रतारणा होती. जनतेने भाजप-शिवसेनेला मते दिली होती म्हणून आम्ही भाजपसोबत युती केली आणि सरकार स्थापन केले.

सत्ता असताना अडीच वर्षांत गटप्रमुखांची आठवण आली नाही. आता आली, त्यांना अडीच वर्षे काडीची किंमत दिली नाही. वर्षावर प्रवेश नव्हता. मातोश्रीवर प्रवेश नव्हता. आम्ही क्रांती केली आणि शिवसैनिकांना चांगले दिवस आले.”

शिवसेनेची मालकी बाळासाहेबांची

“शिवसेना कुणाची मालकी नाही. ती बाळासाहेबांची शिवसेना आहे. शिवसेना पक्षातील लोकांना नोकर समजत असाल तर तसे नाही. दिवसरात्र मेहनत करत या कार्यकर्त्यांनी शिवसेना पुढे नेली. ती शिवसेना प्रायव्हेट लिमिडेट कंपनी नाही. आम्हाला जनतेने समर्थन दिले,” असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in