नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’च्या ११३व्या भागातून देशाला संबोधित केले. कुटुंबावर आधारित राजकारण नवीन प्रतिभांना दडपून टाकते. राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांनी राजकारणात प्रवेश केल्याने लोकशाही बळकट होईल. राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एक लाख तरुणांना राजकीय व्यवस्थेशी जोडण्यासाठी मी यावर्षी लाल किल्ल्यावरून हाक दिली होती. त्यानंतर आलेल्या प्रतिक्रियांवरून देशातील तरुण मोठ्या संख्येने राजकारणात येण्यास तयार आहेत, हे दिसून येते. देशातील तरुण फक्त योग्य संधी आणि योग्य मार्गदर्शनाच्या शोधात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’च्या ऑगस्टच्या भागात पॅरिस ऑलिम्पिक, मॅथ्स ऑलिम्पियाड, आसाम मोइदम, टायगर डे, जंगलांचे संवर्धन आणि स्वातंत्र्य दिनाविषयी चर्चा केली. “२१व्या शतकातील भारतात खूप काही घडत आहे, जे देशाचा पाया मजबूत करत आहे. २३ ऑगस्ट रोजी सर्व देशवासीयांनी पहिला राष्ट्रीय अवकाश दिवस साजरा केला. गेल्या वर्षी याच दिवशी चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिणेकडील शिवशक्ती पॉइंटवर यशस्वीपणे उतरले होते. ही गौरवशाली कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला,” असे ते म्हणाले.