
नवी दिल्ली : मत्स्यप्रेमींना कोळंबी अतिशय प्रिय असते. मऊ, लुसलुशीत कोळंबी खाताना अनेकांच्या जिव्हा तृप्त होतात. आता अमेरिकन टॅरिफचा दणका भारतातील कोळंबी उत्पादकांना बसला आहे. कारण कोळंबीचे दर ८० टक्क्याने घसरले असून त्यामुळे मच्छिमार व कोळंबी उत्पाकांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. आता उत्पादन खर्च भरून काढणेही त्यांना कठीण बनले आहे.
अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्याने कोळंबीची निर्यात ठप्प झाली असून, कोळंबीचे दर ३५० किलो रुपयांवरून ७० रुपये किलोपर्यंत घसरले आहेत. कोळंबीची निर्यात अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यातील ५० काऊंट वन्नामेई जातीच्या कोळंबीला मोठी मागणी असते. ही एका किलोत ५० कोळंबी येतात. आता टॅरिफ वाढल्याने अमेरिकन ग्राहकांसाठी कोळंबीचे दर आवाक्याबाहेर जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात अमेरिकन नागरिक कोळंबीकडे पाठ फिरवू शकतात. यामुळे भारताला जवळपास १ अब्ज डॉलरचे नुकसान होऊ शकते.
मत्स्य प्रक्रियेशी संबंधित व्यक्तींनी सांगितले की, प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांनी कोळंबी खरेदी करणे रोखले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे. कोळंबीचे ७० टक्के उत्पादन हे उन्हाळ्याच्या काळात होते. आता उत्पादन सुरू झाले आहे.
कंपाऊंड लाइव्ह स्टॉक फीड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष दिव्य कुमार गुलाटी म्हणाले की, शेतकऱ्यांमध्ये पहिल्यापासून भीतीचे वातावरण आहे. अमेरिकन कराचा पूर्ण भार शेतकऱ्यांवर पडल्यास त्यांना प्रति किलोमागे ६० ते ७० रुपये तोटा स्वीकारावा लागेल. जर प्रक्रिया कंपन्यांनी १० टक्के शुल्क दिल्यास तरीही शेतकऱ्यांना ३० ते ४० टक्के प्रति किलो नुकसान झेलावे लागेल.
सरकार या संकटाच्या काळात हस्तक्षेप करून निर्यातदार व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी विशेषज्ञांनी केली आहे. टॅरिफच्या संकटाचे लवकरात लवकर निवारण न केल्यास भारताच्या मत्स्य निर्यातीवर मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला.
हेक्टरी लाख रुपये खर्च
कोळंबी पालनासाठी प्रति हेक्टर एक लाख रुपये गुंतवणूक असते. जेव्हा खरेदी थांबते तेव्हा गुंतवणूक धोक्यात येते. भारतात कोळंबी उत्पादनात आंध्र प्रदेश आघाडीवर आहे. आता कोळंबीच्या दरात अचानक घट झाल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत.