
नवी मुंबईतील वाशी एपीएमसी बाजारात गेल्या दोन दिवसांपासून भाज्यांच्या दरात १० ते १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अवकाळी पाऊस आणि अतिउष्णतेमुळे भाज्यांचे उत्पादन घटले आहे. याचाच परिणाम म्हणून दरात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. यामध्ये हिरवा वाटाणा, शिमला मिरची या भाज्यांचा समावेश आहे.
एपीएमसी बाजारात मंगळवार २५ एप्रिल रोजी ५९४ गाड्यांची आवक झाली. यामध्ये काकडी ३९२ क्विंटल आवक, शिमला मिरची १४८२ क्विंटल, फरसबी ७६ क्विंटल, वांगी ३२३ क्विंटल, वाटाणा १०४५ क्विंटल, आवक झाली आहे. तर टोमॅटो, गवार, भेंडी, कोबी, फ्लॉवर, गाजराचे दर स्थिर असून हिरवी मिरची, हिरवा वाटाणा दर उतरले आहेत. तर शिमला मिरची, वांगी, फरसबी, काकडीच्या दरांनी उसळी घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी घाऊक बाजारात फरसबी प्रतिकिलो ४०-४५ रुपयांनी उपलब्ध होती. त्यामध्ये १० रुपयांची वाढ झाली असून आता ५०-५५ रुपयांनी विक्री होत आहे. प्रतिकिलो शिमला मिरची आधी २०-२२ रु होती ती आता ३०-३२ रुपयांनी विकली जात असल्याचे व्यापारी भाऊसाहेब गायकवाड यांनी सांगितले.
दर प्रतिकिलो प्रमाणे :
भाज्या आता आधी
काकडी १६ -१८ १२ -१४
शिमला मिरची ३०- ३२ २० -२२
फरसबी ५० -५५ ४०-४५
वांगी १६ १२
वाटाणा ६० ८०