एअर फोर्स अधिकारी असल्याचे भासवून व्यावसायिकाला ११ लाख ५३ हजारांचा गंडा

या प्रकरणातील तक्रारदार मनीष साखला (३२) याची रबाळे एमआयडीसीमध्ये वाहनांच्या पेंटसाठी लागणारे थिनर बनविण्याची कंपनी आहे.
एअर फोर्स अधिकारी असल्याचे भासवून व्यावसायिकाला ११ लाख ५३ हजारांचा गंडा

नवी मुंबई : एअर फोर्समधील अधिकारी असल्याचे भासवून दोघा सायबर चोरट्यांनी एका व्यावसायिकाकडून थिनर विकत घेण्याचा बहाणा करून त्याच्याकडून तब्बल ११ लाख ५३ हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नवी मुंबई सायबर पोलिसांनी या भामट्यांविरोधात फसवणुकीसह बनावटगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

या प्रकरणातील तक्रारदार मनीष साखला (३२) याची रबाळे एमआयडीसीमध्ये वाहनांच्या पेंटसाठी लागणारे थिनर बनविण्याची कंपनी आहे. गत ३१ जानेवारी रोजी मनजित सिंग नावाने एका सायबर चोरट्याने संपर्क मनीषला संपर्क साधला होता. त्याला ४०० लिटर थिनरची गरज असल्याचे सांगितले होते. त्यावेळी भामट्या मनजित सिंग याने तो आर्मीमध्ये कामाला असल्याचे तसेच सध्या त्याची पोस्टिंग मुंबईतील कलीना येथे झाल्याचे सांगितले. तसेच त्याने त्याचे कॅन्टीन स्मार्ट कार्ड लिकर कार्ड, आधारकार्ड, एअर फोर्स पब्लिक फंड अकाऊंटचा जीएसटी नंबर मनीषच्या व्हॉट्सॲपवर पाठवून दिला. त्यामुळे मनजित सिंग हा मुंबईतील एअर फोर्स येथे कामाला असल्याची खात्री पटली.

त्यानंतर एअर फोर्सच्या अकाऊंट डिपार्टमेंटमधील कॅप्टन असल्याचे सांगून भासवून अमरिंदर सिंग या दुसऱ्या भामट्याने मनिषला संपर्क साधला. तसेच आर्मीबरोबरची त्याची पहिलीच डील असल्यामुळे मिलिटरी कॅम्पच्या अकाऊंटमध्ये ५ रुपये पाठविण्यास सांगितले. त्यामुळे मनीषने ५ रुपये पाठविल्यानंतर त्याने मनीषला १० रुपये पाठवून दिले. त्यानंतर त्याने मनिषला ३३,७४८ रुपये पाठवण्यास सांगितले. त्यामुळे त्याचे पेमेंट रिलीज करता येणार नसल्याचे सांगितले. तसेच मालाचे पैसे हवे असल्यास त्याला आणखी १ लाख १,२४४ रुपयांचे ट्रान्झेक्शन करण्यास सांगितले. त्यानंतर भामट्या अमरिंदर सिंग याने मनीषला त्याची रक्कम परत करण्याच्या बहाण्याने त्याला वेगवेगळ्या बँक खात्यात आणखी १० लाख १८,५६६ रुपये भरण्यास भाग पाडले. अशा पद्धतीने या सायबर चोरट्या मनीषकडून तब्बल ११ लाख ५३ हजार रुपये उकळल्यानंतर त्यांनी आपले फोन बंद करून टाकले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मनीषने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

logo
marathi.freepressjournal.in