पनवेलमध्ये शॉक लागून ११ जण गंभीर जखमी

पनवेल शहर पोलिसांनी कंत्राटदार जे. के. डेकोरेटरच्या मालकाविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे
पनवेलमध्ये शॉक लागून ११ जण गंभीर जखमी

पनवेल तालुक्यातील वडघर विसर्जन घाटावर विद्युत प्रवाह असलेला धातूचा रोप नागरिकांवर पडून झालेल्या दुर्घटनेत कुंभारवाडा येथील एकाच कुटुंबातील ११ व्यक्तींना शॉक लागला. शुक्रवारी रात्री घडलेल्या या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या ११ जणांवर पनवेलमधील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पनवेल शहर पोलिसांनी कंत्राटदार जे. के. डेकोरेटरच्या मालकाविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

उरण नाका येथील वडघर विसर्जन घाटावर सार्वजनिक व घरगुती गणपती विसर्जनासाठी तात्पुरते दोन लोखंडी टॉवर उभारून त्यावर हॅलोजन लाईट लावण्यात आले होते.या टॉवरच्या आधारासाठी धातूच्या रोपचा वापर करण्यात आला होता. रात्री सव्वानऊच्या सुमारास कुंभारवाडा येथील कुटुंबीय गणपती विसर्जनासाठी आले असता, हा धातूचा रोप तुटून त्यांच्या अंगावर पडला. १० ते १२ जणांना शॉक लागून ते सर्व जण खाली कोसळले. पोलिसांनी तत्काळ जनरेटरमधील विद्युतपुरवठा बंद करून सर्व जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल केले. निहाल विनायक चोनकर (५), सर्वम रितेश पनवेलकर (२४), वेदांत सुनील कुंभार (१९), दर्शना दयानंद शिवशिवकर (३६), तनिष्का प्रसाद पनवेलकर (९ महिने) या सात जणांवर पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात तसेच हर्षद दिलीप पनवेलकर (३१), मानस सचिन कुंभार (१७) यांच्यावर लाइफलाइन हॉस्पिटलमध्ये आणि रूपाली रितेश पनवेलकर (३५) व रितेश पनवेलकर (३८) यांच्यावर पटवर्धन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in