मोरा ते मुंबई पोहण्याचा ११ वर्षीय स्वराजचा विक्रम

जिद्द असली की कोणतेही लक्ष्य गाठणे कठीण नसते, हे खरे ठरवत उरण, बाजारपूर येथे राहणाऱ्या ११ वर्षीय स्वराज पाटीलने जलतरणात विक्रम केला आहे.
मोरा ते मुंबई पोहण्याचा ११ वर्षीय स्वराजचा विक्रम
Published on

उरण : जिद्द असली की कोणतेही लक्ष्य गाठणे कठीण नसते, हे खरे ठरवत उरण, बाजारपूर येथे राहणाऱ्या ११ वर्षीय स्वराज पाटीलने जलतरणात विक्रम केला आहे.

मोरा जेट्टी ते मुंबई गेटवे ऑफ इंडिया हे सागरी १२ किलोमीटरचे अंतर स्वराजने पोहून पार केले आहे. उरणच्या सेंट मेरीज हायस्कूलमध्ये सहावीच्या इयत्तेत शिकणाऱ्या स्वराजने आपल्या आईचा वारसा पुढे नेला आहे. त्याला जलतरणात कारकीर्द घडवून आणखी विक्रम रचायचे आहेत. उरण नगर परिषदेच्या जलतरण तलावामध्ये सराव करणारा स्वराज विक्रमादित्य म्हणून ओळखला जाणार आहे. बुधवारी पहाटे ४ वाजून ३९ मिनिटांनी मोरा प्रवासी जेट्टी येथून त्याने समुद्राच्या लाटांवर झेप घेत मुंबई, गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने प्रवास सुरू केला.

समुद्राच्या मोठ्या लाटा, सोसाट्याचा वारा, पाण्याचे बदलणारे प्रवाह, काळोख आणि समुद्रातील मोठ-मोठी जहाजे अशा अडचणीतून वाट मोकळी करत स्वराजने अवघ्या ४ तास २५ मिनिटांत मुंबई गाठात आपला विक्रम पूर्ण केला आहे. यावेळी स्वराजला शुभेच्छा देण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया येथे मोठी गर्दी जमा झाली होती. तर या प्रत्येकाने उपस्थिती दर्शवून स्वराजच्या विक्रमची साक्ष दिली आहे. महत्वाचे म्हणजे स्वराजची आई सोनाली पाटील ही स्वतः एक जलतरणपटू असून, तिने २५ वर्षापूर्वी मोरा ते गेटवे ऑफ इंडिया पोहून पार करण्याचा विक्रम केला होता.

logo
marathi.freepressjournal.in