पार्ट टाइम जॉब देण्याचे आमिष दाखवून १२ लाख १६ हजारांचा गंडा

या प्रकरणात ३० वर्षीय महिला नवीन पनवेल भागात राहण्यास असून एका सायबर टोळीने या महिलेच्या व्हाॅट्सॲपवर पार्ट टाइम जॉबबाबत मेसेज पाठवला होता.
पार्ट टाइम जॉब देण्याचे आमिष दाखवून १२ लाख १६ हजारांचा गंडा

नवी मुंबई : पार्ट टाइम जॉब देण्याच्या बहाण्याने एका सायबर टोळीने नवीन पनवेल भागात राहणाऱ्या एका महिलेला टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने १२ लाख १६ हजार ४०० रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडून तिची ऑनलाईन फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. नवी मुंबई सायबर पोलिसांनी या सायबर टोळीविरोधात फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून या टोळीचा शोध सुरू केला आहे.

या प्रकरणात ३० वर्षीय महिला नवीन पनवेल भागात राहण्यास असून एका सायबर टोळीने या महिलेच्या व्हाॅट्सॲपवर पार्ट टाइम जॉबबाबत मेसेज पाठवला होता. या महिलेने पार्ट टाइम जॉब करण्यास इच्छुक असल्याचे सांगितल्यानंतर सायबर टोळीने या महिलेला दोन लिंक पाठवून देत दोन रेस्टॉरंटला रेटिंग करण्याचा जॉब दिला. या महिलेने सदर हॉटेलचे रेटिंग करून सायबर चोरट्यांना त्याचे फोटो पाठवून दिल्यानंतर सायबर चोरट्यांनी तिची टेलिग्रामद्वारे वैयक्तिक माहिती व बँक खात्याची माहिती मागून घेतली.

पहिला टास्क पूर्ण केल्यानंतर सायबर टोळीने तिच्या बँक खात्यावर १५० रुपये पाठवून दिले. तसेच अशा पद्धतीने एकूण २२ टास्क पूर्ण करण्याचे सांगण्यात आले. ७ टास्क पूर्ण केल्यानंतर ही तिला २२ टास्क पूर्ण करणे गरजेचे असल्याचे सांगत पुढील टास्कबाबत १ हजाराचे आमिष दाखविण्यात आले.

महिलेच्या खात्यात चोरांनी १३०० रुपये पाठवून दिल्यानंतर पुढील टास्कसाठी ३००० ची मागणी केली. अशा पद्धतीने या टोळीने टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने १२ लाख १६ हजार ४०० रुपये रक्कम पाठवल्यानंतर सदर महिलेला पुढील टास्क पूर्ण केल्यास २९ लाख मिळण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यावर महिलेने आपली फसवणूक होत असल्याचे जाणले. त्यानंतर तीने प्रथम एनसीसीआरपी पोर्टलवर ऑनलाईन तक्रार दाखल करून नवी मुंबई पोलीस सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in