
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने महापालिका शाळेतील जवळपास २२०० विद्यार्थ्यांना खालापूर येथील इमॅजिका पार्क या ॲडव्हेंचर पार्क सहलीसाठी नेले. पालिका अधिकारी, कंत्राटदार यांच्या गलथान कारभारामुळे घणसोली शाळा क्र.७६ मधील आठवीत शिकणारा विद्यार्थी आयुष सिंगचा या सहलीदरम्यान मृत्यू झाला. या संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन नवी मुंबई मनसे मध्यवर्ती कार्यालयात करण्यात आले होते.
मुळात शैक्षणिक सहल ही ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक व शैक्षणिक माहिती देणाऱ्या ठिकाणी नेण्यात याव्यात, असा राज्य सरकारचा शासन निर्णय आहे, असे असताना शासन निर्णयाला केराची टोपली दाखवून हजारो मुलांना कडक उन्हात ॲडव्हेंचर पार्कमध्ये नेण्याचा अट्टाहास पालिका शिक्षण विभाग उपायुक्त, शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी का केला? असा प्रश्न उपस्थित होतो. १० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असावा, असे परिपत्रक असताना या सूचनेचे पालन यावेळी करण्यात आले होते का ? उन्हापासून वाचण्यासाठी मुलांना पुरेशी साधने देण्यात आली होती का? इमॅजिकामधील राईड अतिभव्य आणि धोकादायक असताना देखील पालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ का केला? आतापर्यंत जवळपास १० हजारहून जास्त विद्यार्थ्यांना इमॅजिका पार्कमध्ये नेण्यात आले आहे असे अनेक प्रश्न उपस्थित केले.
भरीव आर्थिक मदत करावी
अधिकारी, कंत्राटदार यांच्या अभद्र युतीमुळे एका विद्यार्थ्याचा नाहक जीव गेला आहे. याप्रकरणी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची चौकशी समिती या संपूर्ण घटनेचा अभ्यास करण्यासाठी नेमावी. तत्पूर्वी प्रथमदर्शनी दोषी दिसणारे शिक्षण उपायुक्त व शिक्षणाधिकारी या दोघांना गुन्हा दाखल करून निलंबित करावे. तसेच मृत विद्यार्थ्याच्या पालकांना भरीव आर्थिक मदत करावी, अशी मागणी गजानन काळे यांनी केली.